Home प्रशासन जिल्हा परिषद सारोळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर संशयाचे ढग ; माहिती मागताच अर्जदाराचा नंबर ब्लॅकलिस्ट केल्याचा...

सारोळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर संशयाचे ढग ; माहिती मागताच अर्जदाराचा नंबर ब्लॅकलिस्ट केल्याचा ग्रामसेवकांवर आरोप

0
24


मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत माहिती अधिकार अधिनियमांतर्गत माहिती मागणाऱ्या अर्जदाराला माहिती देण्याऐवजी टाळाटाळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल पाच वर्षांच्या कामांचा हिशोब मागितल्याने “माहिती देता येत नाही” असे सांगत अर्जदाराचा मोबाईल क्रमांक थेट ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याचा आरोप झाल्याने ग्रामपंचायतीच्या पारदर्शक कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अर्जदार पंकज बारसु तायडे यांनी सारोळा ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांसंदर्भात माहिती अधिकाराखाली रीतसर अर्ज दाखल केला होता. अर्ज सादर करून महिना उलटून गेल्यानंतरही कोणतीही माहिती न मिळाल्याने त्यांनी प्रशासकीय कारभारावर नाराजी व्यक्त केली. अर्जदाराने दिलेल्या माहितीनुसार, अर्जावर कार्यवाही करण्याऐवजी संबंधित ग्रामसेवकांनी स्वतः दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, पाच वर्षांच्या कालावधीची माहिती मागितल्याचे समजताच “पाच वर्षांची माहिती देता येत नाही” असे तोंडी सांगून माहिती देण्यास नकार दर्शवण्यात आला.

जेव्हा अर्जदाराने “पाच वर्षांची माहिती कोणत्या कायदेशीर नियमानुसार देता येत नाही?” असा रोखठोक सवाल केला, तेव्हा ग्रामसेवकांनी सोमवारी भेटतो असे सांगून घाईघाईत फोन कट केला. यानंतर अर्जदाराने पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन उचलला गेला नाही आणि कथितरीत्या त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आला. माहिती अधिकार कायद्यानुसार लेखी उत्तर देण्याऐवजी असा प्रकार घडल्याने ग्रामपंचायतीमध्ये काही मोठे गैरव्यवहार किंवा आर्थिक अनियमितता दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी तीव्र शंका व्यक्त केली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात यावी, अशी जोरदार मागणी अर्जदार पंकज तायडे यांनी केली आहे. मागील पाच वर्षांतील सर्व विकासकामे, झालेला खर्च, मंजुरीचे ठराव, देयके आणि प्रशासकीय नोंदींची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच माहिती अधिकार अर्जावर कायद्यानुसार कार्यवाही करून योग्य ती माहिती त्वरित पुरवण्यात यावी आणि अर्जदाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणीही तायडे यांनी केली आहे.


Protected Content

Play sound