Home Cities यावल अंतर्नादची दहा वर्षांची सामाजिक बांधिलकी; ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

अंतर्नादची दहा वर्षांची सामाजिक बांधिलकी; ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

0
4


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवानिमित्त भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमांतर्गत सांगवी येथील जिल्हा परिषद मुलांची व मुलींच्या शाळेतील ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष असून, गेल्या दशकभरापासून सण-उत्सवाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जात आहे.

गणेशोत्सवातील खर्चाला सामाजिक कार्याची दिशा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून यंदा विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल, वह्या, पेन, पट्टी, रंगपेटी, खोडरबर व बालमित्र पुस्तक आदी साहित्य देण्यात आले. गणेश स्थापनेच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी सण-उत्सव साजरे करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. ‘एक दुर्वा समर्पण’च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे सातत्यपूर्ण कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास डी. व्ही. चौधरी, योगेश भंगाळे, स्वप्निल जावळे, अतुल फिरके, शशिकांत मेघे, केंद्रप्रमुख एम. एच. तडवी, निकिताताई कोळी, मुस्तफा तडवी, जयश्री तायडे, सुबोध तायडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. ललित महाजन यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा परिचय करून दिला. समाधान जाधव यांनी सूत्रसंचालन, तर उमेश फिरके यांनी आभार मानले.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सण-उत्सवातील खर्चाचा काही भाग सामाजिक कार्यासाठी देण्याचा संदेश देणारा हा उपक्रम यंदा दहाव्या वर्षातही उत्साहात राबविण्यात आला.


Protected Content

Play sound