


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील साईबाबा मंदिर परिसर, विठोबा नगर, सदाशिव नगर, दत्त नगर, तळेले कॉलनी, शंकरराव नगर आणि सुंदर नगर या भागांतील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण विकासकामांना सुरुवात झाली आहे. तब्बल ३० वर्षांपासून विकासकामांपासून वंचित असलेल्या या परिसरात आर.सी.सी. गटाराच्या कामासह विविध विकासकामांचा शुभारंभ रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या विकासकामांच्या उद्घाटन समारंभाला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील, जळगाव शहराचे आमदार मा. आ. राजुमामा भोळे, जळगाव शहराच्या महापौर दीपमालाताई काळे, उपमहापौर मनोजभाऊ चौधरी, जळगाव शहराचे माजी महापौर ललितभाऊ कोल्हे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, नगरसेवक विशाल भोळे, नगरसेवक पियुष कोल्हे, तसेच आशुतोष पाटील आणि कुंदन काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ३ मधील नगरसेवक प्रविण कोल्हे, निलेश (आबा) तायडे, प्रतिक्षा कैलास सोनवणे आणि अर्चना संजय पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती. याशिवाय परिसरातील नागरिक भालचंद्र दादा चौधरी, अमोल मोरे, राहुल पाटील, भूषण भोळे, भैय्या माळी, मिलिंद खडसे, भागवत किनगे, सुनील ढाके, गोकुळ सोनार, चेतन शर्मा, प्रमोद नारखेडे, सुरज दुबे, विनिता दुबे, प्रमोद भिडे, मिलिंद पाटील, हर्षल चौधरी, लक्ष्मण बाबा बडगुजर यांच्यासह विघ्नहर्ता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अक्षय महाजन, उपाध्यक्ष ओम नारखेडे आणि संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते. परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या मूलभूत सुविधांच्या विकासाला या कामांमुळे चालना मिळणार आहे. विशेषतः आर.सी.सी. गटाराचे काम पूर्ण झाल्यानंतर सांडपाण्याचा निचरा आणि परिसरातील स्वच्छतेच्या दृष्टीने मोठी मदत होण्याची अपेक्षा आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना या माध्यमातून मार्ग मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या परिसरातील विविध भागांमध्ये गेल्या सुमारे ३० वर्षांपासून अपेक्षित विकासकामे झालेली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे रस्ते, गटारी आणि इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने परिसराच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निधीतून आणि प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक प्रविण कोल्हे यांच्या प्रयत्नातून या विकासकामांचा शुभारंभ झाल्याचे सांगण्यात आले. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामे मार्गी लावण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे उपस्थित नागरिकांनी स्वागत केले.



