Home Cities जळगाव गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जळगाव सज्ज ! बाजारपेठेत खरेदीसाठी भाविकांची उदंड गर्दी 

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जळगाव सज्ज ! बाजारपेठेत खरेदीसाठी भाविकांची उदंड गर्दी 

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विघ्नहर्त्या लाडक्या गणरायाचे घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात स्वागत करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असून जळगाव शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शनिवारची सुट्टी साधत आज सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले टॉवर चौक, महात्मा फुले मार्केट, बळीराम पेठ आणि सुभाष चौक परिसरात पूजा साहित्य, फळे आणि मनमोहक गणेशमूर्ती खरेदीसाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. काल झालेल्या पावसामुळे हवामानात आल्हाददायक गारवा निर्माण झाला असून, खरेदीदारांमध्ये मोठा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

यंदा शहर प्रशासनाने बळीराम पेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्टॉल्स उभारण्यास अधिकृत परवानगी दिल्याने या परिसरात खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी उसळली आहे. बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे दुर्वा, जास्वंदाची फुले, मखराचे साहित्य, सजावटीच्या शोभेच्या वस्तू आणि ताजी फळे खरेदी करण्यासाठी दुकानांवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून टॉवर चौक ते मुख्य बाजारपेठ परिसरात विशेष बंदोबस्त व वाहतूक मार्ग वळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, वाढती महागाई आणि कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतींमध्ये सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, महागाईचा हा फटका गणेश भक्तांच्या उत्साहावर अजिबात दिसून येत नाही. लहान-मोठ्या आकर्षक, पर्यावरणपूरक शाडूमातीच्या आणि नक्षीदार मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिक आपापल्या बजेटनुसार पसंती दर्शवत आहेत. बाप्पाच्या मूर्ती घरी नेण्यासाठी विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि बालचमू वाद्यवृंदाच्या तालावर गुलालाची उधळण करत मूर्ती घेऊन जाताना शहरात ठिकठिकाणी दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांनंतर शुक्रवारी झालेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी होऊन चैतन्य निर्माण झाले आहे. उद्या लाडक्या बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होणार असल्याने संपूर्ण जळगाव शहर बाप्पाच्या स्वागतासाठी रोषणाईने नटले असून, “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने खान्देशची ही सुवर्णनगरी दुमदुमून गेली आहे.


Protected Content

Play sound