Home Cities जळगाव तरसोद बोगद्याजवळील डबक्याचा प्रश्न ऐरणीवर ; १५ दिवसांत तोडगा निघाला नाही तर...

तरसोद बोगद्याजवळील डबक्याचा प्रश्न ऐरणीवर ; १५ दिवसांत तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलनाचा प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांचा इशारा!

0
22


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी नशिराबाद जवळील तरसोद बोगद्याजवळ पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येने अत्यंत विक्राळ रूप धारण केले असून, स्थानिक नागरिकवाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याप्रश्नी यापूर्वी खासदार स्मिता वाघ यांनी स्वतः नशिराबाद येथे भेट देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांना चार ते पाच दिवसांत तात्काळ उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले होते. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती जैसे थे असून काल झालेल्या तुफान पावसामुळे बोगद्याजवळ पुन्हा एकदा तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

कालच्या पावसानंतर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांची होणारी दैना पाहून नशिराबाद नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन एनएचएआयच्या संथ आणि बेजबाबदार कारभाराविरोधात तीव्र शब्दांत तक्रार दाखल केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ समस्येचे गांभीर्य लक्षात घेत एनएचएआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून थेट संवाद साधला आणि येत्या पंधरा दिवसांत या डबक्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी व योग्य तोडगा काढण्याचे कडक आदेश दिले आहेत.

दरम्यान, या समस्येवर बोलताना प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. “एनएचएआयच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रोज हजारो नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. जर येत्या पंधरा दिवसांच्या आत यावर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही आणि रस्ता सुकर केला नाही, तर नशिराबादकर नागरिकांना सोबत घेऊन राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा महाजन यांनी दिला आहे. यामुळे आता एनएचएआय या १५ दिवसांच्या मुदतीत काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound