Home धर्म-समाज साकळीत ‘एक गाव, एक गणपती’ला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

साकळीत ‘एक गाव, एक गणपती’ला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
14


यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साकळी ग्रामपंचायत सभागृहात गुरुवारी, ११ सप्टेंबर रोजी शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गणेशोत्सव शांततेत, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. याच बैठकीत यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी मांडलेल्या ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेचे ग्रामस्थ आणि गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस फैजपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिल बडगुजर आणि यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांचे मार्गदर्शन लाभले. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, सामाजिक सलोखा टिकवणे आणि सर्व समाजघटकांनी एकत्रितपणे उत्सव साजरा करणे यावर बैठकीत भर देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना ग्रामस्थांसमोर मांडली. गावातील विविध सार्वजनिक गणपती मंडळांनी एकत्र येऊन एकाच ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना केल्यास गावातील एकोपा, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव आणखी मजबूत होईल, असा संदेश त्यांनी दिला. ‘पुढील वर्षी साकळीत एक गाव, एक गणपती’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या संकल्पनेचे उपस्थित ग्रामस्थ आणि गणेशोत्सव समित्यांनी स्वागत केले. माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांनी पुढील वर्षी ग्रामस्थांशी चर्चा करून साकळीत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. गावाच्या एकतेला बळ देणारा आणि साकळीची वेगळी ओळख निर्माण करणारा आदर्श उभा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. साकळी गावात मागील अडीच वर्षांत एकही जातीय वाद झालेला नसल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. गणेशोत्सव, विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी सामाजिक एकता आणि बंधुभावाची परंपरा कायम जपली आहे. त्यामुळे ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित न राहता गावातील सामाजिक ऐक्याला आणखी बळ देणारी ठरू शकते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

फैजपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिल बडगुजर यांनीही साकळीतील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कौतुक केले. गावातील बंधुभाव आणि सामाजिक एकता कोणत्याही कारणामुळे भंग पावता कामा नये. साकळीने आदर्श गाव म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव मंडळांनी केवळ मनोरंजनापुरता उत्सव मर्यादित न ठेवता सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य द्यावे, असे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी सांगितले. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, व्यसनमुक्ती आणि जनजागृती यांसारखे उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, ध्वनिप्रदूषण टाळावे आणि प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांनीही ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेचे स्वागत केले. साकळीत आधीपासूनच सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची परंपरा असून या संकल्पनेमुळे गावातील एकतेला गणरायाच्या उत्सवाची नवी जोड मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. ‘एक गाव, एक विचार, एकता आणि बंधुभाव’ असा संदेश देण्याची संधी साकळीसमोर असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. बैठकीचे सूत्रसंचालन तंटामुक्ती समितीचे सचिव योगेश खेवलकर यांनी केले. यावेळी तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते युनूस मन्सूरी, सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख, माजी ग्रामपंचायत उपसरपंच तथा सदस्य फकृद्दीन कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य मुकेश बोरसे, ग्रामपंचायत सदस्य परमानंद बडगुजर, माजी ग्रामपंचायत सदस्य सय्यद अशफाक सय्यद शौकत, वासिम खान अय्युब खान, नितीन फन्नाटे, युवा प्रगतिशील शेतकरी पुष्कर जितेंद्र महाजन यांच्यासह तंटामुक्ती समितीचे सदस्य, विविध गणपती उत्सव समित्यांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound