


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहर परिसरातील उघड्यावर व रस्त्यालगत मास विक्री करणाऱ्या दुकानदारांना नगरपरिषदेने बंदिस्त जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी व्यापारी संघटना वरणगावच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत व्यापारी संघटनेने वरंगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वरणगाव शहर परिसरातील उघड्यावर तसेच रस्त्यालगत मास विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना नगरपरिषदेची जागा उपलब्ध करून देण्यात यावी. सध्या अनेक मास विक्रीची दुकाने रस्त्यालगत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, जैन धर्मियांचा पर्युषण पर्व सुरू असून आगामी काळात गणेशोत्सव व दुर्गोत्सव यांसारखे सण येणार आहेत. या काळात रस्त्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढते. पुरुष, महिला, विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींची ये-जा वाढत असल्याने रस्त्यालगत सुरू असलेल्या मास विक्रीच्या दुकानांमुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता व्यापारी संघटनेने व्यक्त केली आहे.
तसेच रस्त्यावर असलेल्या मास विक्रीच्या दुकानांमुळे परिसरात कुत्र्यांचा वावर वाढत असून त्यातून अपघात होण्याची शक्यताही निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करून मास विक्रेत्यांसाठी योग्य व बंदिस्त जागेची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
व्यापारी संघटनेच्या या निवेदनाची प्रत वरंगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनाही देण्यात आली आहे. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व व्यापारी वर्गाने प्रशासनाने नागरिकांची गैरसोय तसेच रस्त्यावरील अडथळे लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



