


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद नगरपरिषदेची सूत्रे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पंकज महाजन यांनी स्वीकारताच प्रशासनाला कामाचा वेग देण्यासाठी आणि नगरपरिषदेचा कारभार शिस्तबद्ध करण्यासाठी थेट ॲक्शन मोड धारण केला आहे. नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेताना नागरिकांची कामे कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित राहता कामा नयेत, प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे आणि नशिराबादच्या विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई अथवा कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमच त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला भरला आहे.
नगरपरिषदेत आयोजित आढावा बैठकीत प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांनी स्वच्छता, नियमित पाणीपुरवठा, बांधकाम विभाग आणि शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. “नशिराबाद शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी काम करण्याची तयारी नसेल, तर सरळ काम सोडून निघून जा,” अशा अत्यंत कडक व स्पष्ट शब्दांत त्यांनी कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. या बैठकीस बांधकाम सभापती विकास पाटील, पाणीपुरवठा सभापती कीर्तीकांत चौबे आणि शिवसेना गटनेत्या नगरसेविका शैला व्यवहारे यांनीही सहभाग नोंदवत नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले.
या आढावा बैठकीत नशिराबाद शहराच्या हितासाठी दोन महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णय घेण्यात आले. त्यानुसार नशिराबाद शहरात येत्या १७ सप्टेंबरपासून प्लास्टिक बंदीची अत्यंत कडक व प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, नागरिकांचे प्रश्न थेट त्यांच्या दारात जाऊन जाणून घेण्यासाठी येत्या २८ सप्टेंबरपासून ‘नगराध्यक्ष व नगरसेवक आपल्या दारी’ हा विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. या अभियानांतर्गत लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतील आणि जागेवरच त्या सोडवण्यासाठी प्रशासनाला आदेश देतील.
दरम्यान, या बैठकीच्या निमित्ताने नशिराबाद नगरपरिषदेतील महिला लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा आणि महिला आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू असताना, प्रत्यक्ष आढावा बैठकीत मात्र काही महिला लोकप्रतिनिधींच्या ऐवजी त्यांचे पती किंवा पुत्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना देताना आणि चक्क व्यासपीठावर स्थानापन्न झालेले दिसून आले. या चित्रामुळे “महिला नगरसेविका घरी आणि पती-पुत्रच नगरपरिषदेचे कारभारी?” असा थेट सवाल नशिराबादकरांमधून उपस्थित केला जात असून, महिला आरक्षणाचा मूळ उद्देश आणि प्रत्यक्ष प्रशासकीय वास्तव यातील ही तफावत सध्या शहरात चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.



