Home Cities जळगाव विषमुक्त शेती, क्लेशमुक्त जीवन!’ पिलखेड्यात बळीराजाचा अनोखा संकल्प

विषमुक्त शेती, क्लेशमुक्त जीवन!’ पिलखेड्यात बळीराजाचा अनोखा संकल्प

0
1


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बळीराजाचा सर्वात मोठा सण असलेला पोळा पारंपरिक श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करतानाच, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि निसर्गपूरकतेची जोड देणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे, असे प्रतिपादन जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. पिलखेडा येथे कृषी विभाग आणि ‘आत्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पोळा उत्सवात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत पोळा सण साजरा करत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनच्या लाभार्थी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
या विशेष कार्यक्रमादरम्यान पिलखेडा येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘जैव निविष्ठा संसाधन केंद्राचा’ (BIRC) जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते औपचारिक शुभारंभ करण्यात आला. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी लागणारे आवश्यक जैविक घटक, जीवामृत, बीजामृत आणि वनस्पतीजन्य अर्क स्थानिक पातळीवरच सहजरीत्या उपलब्ध व्हावेत, या मुख्य उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली.
कार्यक्रमात बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी जमिनीचे आरोग्य सुधारणे आणि शेतीचा वाढता उत्पादन खर्च कमी करणे यावर भर दिला. पारंपरिक शेती पद्धतींसोबतच सेंद्रिय व नैसर्गिक निविष्ठांचा वापर वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी विभाग व ‘आत्मा’च्या माध्यमातून राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचवला जात आहे. पिलखेडा येथील जैव निविष्ठा संसाधन केंद्र हे परिसरातील सर्व शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीचे एक प्रमुख मार्गदर्शक केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन अडचणी जाणून घेतल्या आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी पिलखेडा येथील ग्रामस्थ आणि उपस्थित शेतकऱ्यांनी रासायनिक खते व घातक कीटकनाशकांचा अतिवापर पूर्णपणे टाळून ‘विषमुक्त शेती करून क्लेशमुक्त जीवन जगण्याचा’ सामूहिक संकल्प केला.
या सोहळ्याला उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले, तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, मंडळ कृषी अधिकारी शरद पाटील, उप कृषी अधिकारी योगेश अत्रे, सरपंच रोहिणी साळुंखे, तेजल चौधरी, डॉ. अतुल चौधरी, राजेंद्र चौधरी, किशोर चौधरी, भावलाल साळुंखे, योगराज भालेराव, पंकज चौधरी यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी सखी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिलखेडा येथे कृषी विभाग आणि ‘आत्मा’च्या वतीने पारंपरिक पोळा उत्सव उत्साहात पार पडला. याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते ‘जैव निविष्ठा संसाधन केंद्राचा’ शुभारंभ करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी परंपरा जपत निसर्गपूरक व विषमुक्त नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


Protected Content

Play sound