Home प्रशासन मालोद-आडगाव रस्ता काटेरी झुडुपांच्या वेढ्यात ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आक्रमक

मालोद-आडगाव रस्ता काटेरी झुडुपांच्या वेढ्यात ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आक्रमक

0
8


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या आडगाव, मालोद आणि नायगाव या आदिवासी वस्तीपाड्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता चोपडा विधानसभा मतदारसंघांतर्गत येत असून, सद्यस्थितीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर काटेरी झाडे आणि झुडपांची गुंफण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद प्रशासनाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे हा मार्ग अपघातांचा सापळा बनला असून परिसरातील ग्रामस्थांनी व प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या ग्रामीण व आदिवासी भागातील रस्त्यावर ठीकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याच्या दुतर्फा उगवलेल्या काटेरी झाड-झुडपांमुळे रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांना अत्यंत सावधगिरीने वाहने चालवावी लागत आहेत. झाडांच्या फांद्या थेट रस्त्यावर आल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना चालकांची मोठी कसरत होते. अनेकदा यावरून वाहनधारकांमध्ये आपापसात शाब्दिक वाद आणि किरकोळ हाणामारीचे प्रकार घडत असून लहान-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत.

विशेष म्हणजे, यावल एसटी आगाराच्या बसेस याच मार्गावरून दररोज धावतात. बस आणि इतर मोठी वाहने समोरासमोर आल्यास काटेरी झुडुपांमुळे रस्ता पूर्णपणे अडवला जातो. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही देखभाल अथवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोक्याचे ठरत आहे. या रस्त्यावरील वाढलेली काटेरी झाडे-झुडपे तातडीने छाटून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, तसेच खड्डे बुजवून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, शेतकरी आणि वाहनधारकांकडून केली जात आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.


Protected Content

Play sound