Home धर्म-समाज यावल तालुक्यात पावसाची दडी ; बैलपोळ्याच्या उत्साहावर चिंतेचे ढग

यावल तालुक्यात पावसाची दडी ; बैलपोळ्याच्या उत्साहावर चिंतेचे ढग

0
12


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील शेती पिके पूर्णपणे धोक्यात आली आहेत. शेतातील उभ्या पिकांची सुकवाट पाहताना बळीराजा हवालदिल झाला असून संपूर्ण तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे. कृषी संस्कृती आणि मराठी परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा बैलपोळा सण अगदी तोंडावर आला असताना, पावसाअभावी निर्माण झालेल्या या संकटामुळे यंदाच्या पोळा सणावर उदासीनतेचे सावट स्पष्टपणे दिसून येत आहे.

मराठी संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यातील पिठारी अमावस्येला साजरा होणारा बैलपोळा हा सण प्रामुख्याने शेतकरी आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर शेतात राबणाऱ्या जिवाभावाच्या सर्जा-राजाच्या कृतज्ञतेचा उत्सव असतो. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांची विशेष काळजी घेतात. परंपरेनुसार या सणाच्या दिवशी बैलांच्या शिंगांना तासून आकर्षक रंग लावले जातात. त्यांच्या अंगावर मखमली नक्षीकाम केलेली झुल, गळ्यात घुंगरांच्या माळा (घांगऱ्या), कपाळावर बाशिंग आणि पायात तोडे घालून बैलांना मोठ्या थाटामाटात सजवले जाते. या दिवशी घरात पुरणपोळी आणि कढीचा बेत करून सजवलेल्या बैलांची पूजा केली जाते व त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवला जातो. त्यानंतर संध्याकाळी ढोल-ताशांच्या गजरात ग्रामदैवताच्या साक्षीने बैलांची भव्य मिरवणूक काढण्याची प्रथा आहे.

मात्र, यंदा यावल तालुक्यात दीड महिन्यापासून पाऊस गायब असल्याने परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शेतातील पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. उत्पन्नाची कोणतीही शाश्वती उरली नसल्याने सण-उत्सव कसे साजरे करायचे, असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. ऐन सणाच्या काळात सुखाचा घास भरवणारा वरुणराजा रुसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हिरवला गेला आहे. बाजारात सणासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठीही शेतकरी धजावत नसल्याने व्यापाऱ्यांमध्येही मंदीचे वातावरण आहे.


Protected Content

Play sound