Home प्रशासन नगरपालिका वरणगावातील AMRUT पाणीपुरवठा पाइपलाइन कामांवर प्रश्नचिन्ह ; स्वतंत्र तांत्रिक चौकशीची नगरसेवक विनोद...

वरणगावातील AMRUT पाणीपुरवठा पाइपलाइन कामांवर प्रश्नचिन्ह ; स्वतंत्र तांत्रिक चौकशीची नगरसेवक विनोद झोपे यांची मागणी

0
11


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव नगरपरिषद हद्दीत सुवर्ण जयंती नगरोत्थान / AMRUT योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या कामांबाबत काही गंभीर बाबी निदर्शनास येत असल्याचा दावा करत नगरसेवक विनोद गणेश झोपे यांनी स्वतंत्र वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अपूर्ण कामे, पाइपलाइनची प्रत्यक्ष खोली, कनेक्शनची संख्या, नाल्यातून टाकण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन तसेच प्रत्यक्ष मोजमाप आणि बिलिंगमध्ये संभाव्य अनियमितता झाली आहे का, याची तपासणी करण्याची मागणी त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे ८ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

झोपे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, योजनेअंतर्गत करण्यात आलेली काही कामे अद्याप अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरातील काही भागांत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन नाल्यातून अथवा नाल्याच्या मार्गातून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा पद्धतीने पाइपलाइन टाकण्यात आली असल्यास पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सर्व कामांची यादी तयार करून प्रत्येक काम प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे किंवा नाही, याची स्थळ पाहणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अपूर्ण असलेल्या कामांची ठिकाणनिहाय यादी तयार करून ती कोणत्या कारणामुळे अपूर्ण राहिली, याचीही चौकशी करावी, असे झोपे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अपूर्ण काम पूर्ण झाल्याचे दाखवून त्यासाठी Running Bill किंवा Final Bill अदा करण्यात आले आहे का, याची कागदपत्रांसह तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.नाल्यातून किंवा नाल्याच्या संपर्कात येईल अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली असल्यास त्या सर्व ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मंजूर अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता अथवा संबंधित तांत्रिक नियमांमध्ये अशा प्रकारे पाइपलाइन टाकण्यास परवानगी आहे का, याची पडताळणी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

नाल्यातून पाइपलाइन टाकल्यामुळे पाइपला नुकसान होणे, दूषित पाणी पाइपमध्ये जाणे किंवा भविष्यात पिण्याचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो का, याबाबत सक्षम तांत्रिक अथवा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून अहवाल घेण्यात यावा, असेही निवेदनात नमूद आहे. आवश्यक असल्यास अशा ठिकाणी पाइपलाइन नाल्याबाहेर सुरक्षित आणि तांत्रिक मानकांनुसार स्थलांतरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.पाइपलाइनची मंजूर खोली आणि प्रत्यक्ष खोली यांची स्वतंत्र तांत्रिक पथकामार्फत फेरमोजणी करावी, तसेच पाइपलाइनची प्रत्यक्ष लांबी, व्यास, वापरलेले साहित्य आणि त्याचे प्रमाण यांची मंजूर अंदाजपत्रकाशी तुलना करावी, अशी मागणी नगरसेवक झोपे यांनी केली आहे. त्याचबरोबर योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कनेक्शनची संख्या आणि प्रत्यक्ष देण्यात आलेल्या कनेक्शनची संख्या घरनिहाय अथवा ठिकाणनिहाय तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे.कामाशी संबंधित Measurement Book (MB), Level Book, Work Order, Estimate, Technical Sanction, Running Bills आणि Final Bill यांची सखोल तपासणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रत्यक्ष झालेल्या कामापेक्षा जास्त काम दाखवून बिल अदा केले असल्याचे किंवा अपूर्ण कामाचे पूर्ण बिल काढल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांकडून शासकीय निधीची रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पाइपलाइनची खोली कमी असणे, नाल्यातून पाइपलाइन टाकणे, काम अपूर्ण राहणे, काम निकृष्ट दर्जाचे असणे किंवा मोजमापाच्या नोंदींमध्ये अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, अभियंता आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची चौकशी नगरपरिषदेतील संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांमार्फत न करता स्वतंत्र वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान शासकीय निधीचा गैरवापर, खोटी मोजमाप नोंद, फुगवलेले बिल, अपूर्ण कामाचे पूर्ण बिल अथवा संबंधितांमध्ये संगनमत आढळल्यास नियमानुसार विभागीय तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नगरसेवक झोपे यांनी केली आहे. तसेच स्थळ पाहणीचा पंचनामा, तांत्रिक चौकशी अहवाल आणि दोषी आढळलेल्या व्यक्तींवर करण्यात आलेल्या कारवाईची लेखी माहिती आपल्याला देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला असल्याने केवळ कागदोपत्री तपासणी न करता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाइपलाइनची खोली मोजणे, नाल्यातील पाइपलाइनची पाहणी करणे, अपूर्ण कामांचे मोजमाप करणे आणि प्रत्यक्ष कनेक्शनची संख्या तपासणे आवश्यक असल्याचे झोपे यांनी निवेदनात नमूद केले आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्याचा पंचनामा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामाचे कोणतेही प्रलंबित अंतिम देयक असल्यास ते अदा करू नये, तसेच कामे पूर्ण होईपर्यंत ही योजना नगरपरिषदेकडे हस्तांतरित करू नये, अशीही विनंती करण्यात आली आहे. कामे झालेल्या ठिकाणचे फोटो लोकेशनसह निवेदनासोबत जोडल्याचेही नगरसेवक विनोद गणेश झोपे यांनी नमूद केले आहे.


Protected Content

Play sound