Home Cities यावल यावलच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र-वाणिज्य मंडळाचे उद्घाटन

यावलच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र-वाणिज्य मंडळाचे उद्घाटन

0
10


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र व वाणिज्य मंडळाचा उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र आणि वाणिज्य विषयांचे व्यावहारिक महत्त्व, बदलत्या आर्थिक क्षेत्रातील संधी तसेच भविष्यातील करिअरच्या विविध वाटांविषयी मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एच. जी. भंगाळे होते. प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत अर्थशास्त्र आणि वाणिज्य या विषयांचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. या दोन्ही शाखांमधून उपलब्ध होणाऱ्या विविध शैक्षणिक व व्यावसायिक संधींची माहिती देत विद्यार्थ्यांनी विषयाचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. एच. जी. भंगाळे यांनी अर्थशास्त्र व वाणिज्य विषयांचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध अधोरेखित केला. आर्थिक व्यवहार, बाजारपेठ, उद्योग, व्यापार तसेच आर्थिक नियोजन समजून घेण्यासाठी या विषयांचे ज्ञान उपयुक्त ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरता अभ्यास न करता विषयाची व्यावहारिक बाजू समजून घेण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनीष बारी यांनी केले. यावेळी त्यांनी अर्थशास्त्र व वाणिज्य मंडळाच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दलची आवड निर्माण करणे, त्यांच्या ज्ञानात भर घालणे, विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणे तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, या दृष्टीने मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. सी. टी. वसावे यांनी केले. उद्घाटन सोहळ्यास प्रा. डॉ. एस. डी. जाधव, प्रा. डॉ. इमरान खान, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा. ए. एन. गायकवाड यांच्यासह अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील सुमारे ३० विद्यार्थी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. डॉ. निर्मला पवार यांनी आभार मानले.


Protected Content

Play sound