
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भाग अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्रशासनाने ‘स्वच्छ, सुंदर व हरित जळगाव’ हा विशेष उपक्रम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची ग्रामीण भागात काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना विविध निर्देश दिले आहेत. कचरा संकलन, वर्गीकरण, विल्हेवाट आणि जनजागृतीसाठी कालबद्ध नियोजन करण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ नुसार कचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी असे चार प्रवाहांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर निश्चित करण्यात आली आहे. या व्यवस्थेत बल्क वेस्ट जनरेटर, रिसायकलिंग, रिफ्यूज डिराईव्ह्ड फ्युएल, वेस्ट टू एनर्जी, सॅनिटरी लँडफिल तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या केंद्रीकृत ईपीआर पोर्टलसारख्या संकल्पनांचाही समावेश करण्यात आला आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींनी नियमितपणे घरोघरी जाऊन कचरा संकलन करावे, तसेच उपलब्ध ट्रायसायकल, ट्रॅक्टर, फॅब्रिकेशन शेड आणि इतर पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा, उपकरणे आणि इतर बाबींसाठी १५ वा व १६ वा वित्त आयोग तसेच ग्रामपंचायतींच्या स्वनिधीचा वापर करता येणार आहे. प्रत्येक गणनिहाय अथवा जास्तीत जास्त पाच ग्रामपंचायतींसाठी विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यांच्यावर कचरा संकलन, वर्गीकरण, देखरेख, नियंत्रण आणि अहवाल संकलनाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. घरोघरी कचरा संकलनासाठी उपलब्ध स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता दूत आणि बचत गटांचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन आराखडा तयार करायचा आहे. या आराखड्यात कचरा संकलन वाहनांचे व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण शेड, आवश्यक मनुष्यबळ आणि इतर सुविधांचा समावेश करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक मनुष्यबळ ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून किंवा १५ व्या व १६ व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध तरतुदीतून नियुक्त करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींच्या अधिपत्याखालील नादुरुस्त कचरा संकलन वाहने तातडीने दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कचरा संकलन केंद्र, त्याचा परिसर आणि कंपोस्ट पीट यांची स्वच्छता करून तेथील आवश्यक सुविधा सुस्थितीत आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण साखळी सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतींनी उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करावा, यावर प्रशासनाने भर दिला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील पारंपरिक कचरा डम्पिंग ग्राउंडची पाहणी करून संबंधित ठिकाणे २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत स्वच्छ करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून साचलेल्या कचऱ्याच्या ठिकाणांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
याशिवाय ग्रामपंचायत क्षेत्रातील बल्क वेस्ट जनरेटर संस्थांची पाहणी करून त्यांची १० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे. संबंधित संस्थांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांनी कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी, यासाठी प्रशासनाकडून देखरेख केली जाणार आहे. या अभियानात तालुकास्तरावर गटविकास अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार असून, जिल्हास्तरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही आयोजित करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाच्या माध्यमातून शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, कचरा वर्गीकरण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचविण्यावरही भर दिला जाणार आहे. गावपातळीवर व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना करण्यात आले आहे. विशेषतः बचत गटांमधील महिलांच्या सहभागातून ग्रामीण भागात स्वच्छता, कचरा वर्गीकरण आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांचा सहभाग या अभियानाचा महत्त्वाचा आधार ठरणार आहे. ‘स्वच्छ, सुंदर व हरित जळगाव’ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि सुंदर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कालबद्ध नियोजन केले आहे. कचरा संकलनापासून ते विल्हेवाटीपर्यंतची व्यवस्था मजबूत करण्यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय आणि पर्यावरणाबाबतची जबाबदारी निर्माण करण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.



