Home आरोग्य जखमी गोविंदांसाठी चौधरी कुटुंबीयांची माणुसकीची सेवा ; तीन पिढ्यांपासून मोफत उपचार

जखमी गोविंदांसाठी चौधरी कुटुंबीयांची माणुसकीची सेवा ; तीन पिढ्यांपासून मोफत उपचार

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘गोविंदा आला रे आला…’ या गजराने दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचतो. मानवी मनोरे रचत हंडी फोडण्याचा हा रोमांचक खेळ पाहताना उपस्थितांच्या काळजाचा ठोका क्षणोक्षणी चुकतो. मात्र, या थरारक खेळात सहभागी होणाऱ्या गोविंदांना दुखापतीचा धोका असतो. अशा वेळी जखमी गोविंदांना आधार देत जळगावातील हाडवैद्य डॉ. अवधूत नामदेव चौधरी यांचे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून मोफत उपचाराची सेवा देत आहे.

दहीहंडी फोडताना मानवी मनोरे रचले जातात. उंचावर चढताना किंवा मनोरा कोसळताना गोविंदांना हात-पाय, खांदा, पाठ किंवा शरीराच्या इतर भागांना दुखापत होण्याच्या घटना घडतात. खेळातील उत्साह आणि संघाची जबाबदारी यामुळे अनेक गोविंदा दुखापत झाली तरी खेळ सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, दुखापतीकडे दुर्लक्ष न करता योग्य उपचार घेणे महत्त्वाचे असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित होत आहे. डॉ. अवधूत नामदेव चौधरी यांच्या कुटुंबीयांकडून अशा जखमी गोविंदांवर उपचार करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून दहीहंडीच्या उत्सवादरम्यान दुखापत झालेल्या गोविंदांना कोणतेही शुल्क न आकारता उपचार दिले जात आहेत. यंदाही ही सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही मोफत उपचारसेवा केवळ दहीहंडीपुरती मर्यादित नसून कबड्डी, क्रिकेट तसेच अन्य खेळांमध्ये दुखापत झालेल्या खेळाडूंनाही चौधरी कुटुंबीयांकडून उपचार दिले जातात. खेळाडूंना दुखापतीनंतर तातडीने आधार मिळावा आणि आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, या भावनेतून ही सेवा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाही जखमी गोविंदांसाठी मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहीहंडी फोडताना दुखापत झालेल्या गोविंदांनी जळगावातील अस्थी संधनालय, ६०५, विठ्ठलपेठ, पांजरापोळ टॉकीजजवळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. अवधूत चौधरी यांनी केले आहे. उत्सवाचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. दुखापत झाल्यास ती किरकोळ समजून दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला आणि आवश्यक उपचार घेणे गरजेचे आहे. चौधरी कुटुंबीयांची तीन पिढ्यांपासून सुरू असलेली मोफत उपचारसेवा ही खेळाडू आणि गोविंदांसाठी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.


Protected Content

Play sound