Home Cities चोपडा चोपड्यात रानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; आदिवासी पारंपरिक खाद्यसंस्कृती व औषधी गुणधर्मांची...

चोपड्यात रानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; आदिवासी पारंपरिक खाद्यसंस्कृती व औषधी गुणधर्मांची विद्यार्थ्यांकडून माहिती

0
9


यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि सातपुडा परिसरातील रानभाज्यांचे संवर्धन व जतन करण्याच्या उद्देशाने चोपडा येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दाहाल सुरेश पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा येथे झालेल्या या महोत्सवात विविध स्थानिक रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. नागरिक, लाभार्थी, विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जळगाव यांच्या आयोजनातून हा उपक्रम राबविण्यात आला. आदिवासी समाजामध्ये पारंपरिक पद्धतीने विविध रानभाज्यांचा आहारात वापर केला जातो. या रानभाज्यांचे पोषणमूल्य, पारंपरिक महत्त्व, औषधी उपयोग आणि त्यांचे संवर्धन याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, हा महोत्सवामागील प्रमुख उद्देश होता. महोत्सवाचे उद्घाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील आणि प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी डॉ. संध्या सोनवणे, तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी, कर्मचारी, अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि आदिवासी समाजातील बांधव उपस्थित होते.

महोत्सवात सातपुडा पर्वतरांगांमध्ये तसेच आदिवासी भागात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या प्रत्यक्ष प्रदर्शनासाठी मांडण्यात आल्या. प्रत्येक रानभाजीची ओळख, स्थानिक नाव, पारंपरिक पद्धतीने केला जाणारा आहारातील उपयोग, पोषणमूल्य तसेच पारंपरिक औषधी गुणधर्म याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग. विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध रानभाज्यांची माहिती संकलित करून त्यांचे प्रत्यक्ष प्रदर्शन मांडले. रानभाज्यांची ओळख करून देण्याबरोबरच त्यांचा पारंपरिक आहारातील उपयोग आणि औषधी गुणधर्म याबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित लाभार्थी, पालक, नागरिक व इतर विद्यार्थ्यांना माहिती दिली.

रानभाज्यांमध्ये विविध पोषणघटक आणि पारंपरिक औषधी गुणधर्म असल्याची माहिती या महोत्सवातून देण्यात आली. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा पारंपरिक पद्धतीने उपयोग कसा केला जातो, याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण, जतन आणि पुढील पिढीकडे हस्तांतरण करण्यास या उपक्रमामुळे हातभार लागला. रानभाज्यांच्या प्रदर्शनामुळे नागरिकांना आपल्या परिसरात सहज उपलब्ध असलेल्या अनेक पारंपरिक खाद्यपदार्थांची नव्याने ओळख झाली. त्याचबरोबर स्थानिक जैवविविधता आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीच्या संवर्धनाची गरज अधोरेखित झाली. पारंपरिक ज्ञान केवळ एका पिढीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी महोत्सव महत्त्वाचा ठरला.

विद्यार्थ्यांनी स्वतः माहिती संकलित करून ती उपस्थितांसमोर सादर केल्याने त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत झाली. तसेच नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सादरीकरण कौशल्य विकसित होण्यासही या उपक्रमाचा उपयोग झाला. आपल्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्ती, पारंपरिक खाद्यपद्धती आणि आदिवासी समाजाचे ज्ञान समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.  दिवसभर चाललेल्या या महोत्सवाला एकूण १२२ लाभार्थी व नागरिक, ३२ विद्यार्थी, ४३ शिक्षक व कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. नागरिकांनी रानभाज्यांविषयी उत्सुकतेने माहिती जाणून घेत प्रदर्शनाला भेट दिली.


Protected Content

Play sound