Home क्राईम बोदवडमध्ये पोलिसांचे धडक कॉम्बिंग ऑपरेशन ; ६० रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी

बोदवडमध्ये पोलिसांचे धडक कॉम्बिंग ऑपरेशन ; ६० रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी

0
1


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवण्यासह अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ४ सप्टेंबर २०२६ रोजी व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत ६० रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली, तर त्यापैकी तीन जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच ४२ संशयित मोटारसायकलींची तपासणी करण्यात आली असून, अवैध दारूविरोधातील कारवाईत एकूण १० हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हे विशेष अभियान राबविण्यात आले. या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, आठ पोलीस अधिकारी, १३० पोलीस अंमलदार तसेच आर.सी.पी. पथक सहभागी झाले होते. कारवाईदरम्यान पोलिसांनी बोदवड पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी केली. एकूण ६० आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन जण आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांचे लक्ष राहावे आणि संभाव्य गुन्हेगारी घटना रोखता याव्यात, या उद्देशाने ही तपासणी करण्यात आली. कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान अवैध दारूविक्रीविरोधातही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एकूण १० हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ५५ लिटर गावठी दारू तसेच ६६ नग देशी दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. संबंधित व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

याशिवाय पोलिसांनी ४२ संशयित मोटारसायकलींची तपासणी केली. या वाहनांची कागदपत्रे, नोंदणी तसेच मालकी हक्काबाबत तपासणी सुरू आहे. संबंधित वाहनांची आर.टी.ओ. विभागामार्फतही तपासणी करण्यात येत असून, कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित वाहनधारकांविरुद्ध नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. बोदवड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवणे, अवैध दारू व इतर बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया यापुढेही सातत्याने करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, नागरिकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती, अवैध दारूविक्री, अंमली पदार्थांची विक्री, जुगार किंवा अन्य कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना सहकार्य करावे. नागरिकांकडून प्राप्त होणारी माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील, परि उपअधीक्षक सह्याद्री बिले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह आठ पोलीस अधिकारी, १३० पोलीस अंमलदार आणि आर.सी.पी. पथकाने कारवाईत सहभाग घेतला.


Protected Content

Play sound