Home Cities जळगाव भाजप उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती 

भाजप उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती 

0
4


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी नाशिक येथील सक्रिय कार्यकर्ते शिवम शिंपी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. एका सामान्य कार्यकर्त्याच्या सातत्यपूर्ण, अभ्यासू आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याने उत्तर महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शिवम शिंपी हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा येथील रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगरदेवळा येथे झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी जळगाव शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीनिमित्त ते नाशिक येथे स्थायिक झाले. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये सक्रियपणे काम करत पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये आपला ठसा उमटविला. पक्षाचे कार्यालयीन व्यवस्थापन, विविध कार्यक्रम व अभियानांचे नियोजन, त्यांची अंमलबजावणी तसेच उपक्रमांचे वस्तुनिष्ठ रिपोर्टिंग यामध्ये शिवम शिंपी यांनी प्रभावी काम केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळत पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. निवडणुकीच्या काळात पक्षाच्या विविध उपक्रमांचे नियोजन, समन्वय आणि अहवाल तयार करण्यामध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या संघटनात्मक कामामुळे पक्षाच्या बांधणीला आणि निवडणूक व्यवस्थापनाला हातभार लागल्याचे मानले जाते. शिवम शिंपी यांचा पक्षातील वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच सामान्य कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क राहिला आहे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, कामातील सातत्य आणि प्रत्येकाशी संवाद साधण्याची पद्धत यामुळे ते पक्षातील अनेकांच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. त्यामुळेच त्यांच्या संघटनात्मक अनुभवाचा विचार करून उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे. नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवम शिंपी यांनी हे पद नसून पक्षाने सोपविलेली मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. एका सामान्य कार्यकर्त्याच्या निष्ठा आणि मेहनतीचा पक्षश्रेष्ठींनी केलेला हा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाच्या कामकाजाची माहिती वेळेवर पोहोचविणे, त्यांच्या अडीअडचणी तसेच सुख-दुःख जाणून घेणे आणि विविध विषयांचे अहवाल सातत्याने अद्ययावत ठेवणे ही आपली प्रमुख प्राथमिकता राहणार असल्याचे शिंपी यांनी स्पष्ट केले. आपल्या निवडीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रदेशातील महामंत्री, संघटनमंत्री, कार्यालय मंत्री तसेच उत्तर महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा व मंडळ अध्यक्ष आणि महामंत्र्यांचे आभार मानले. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आगामी काळात अधिक जबाबदारीने काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शिवम शिंपी यांच्या नियुक्तीबद्दल उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नगरदेवळा येथील एका सामान्य कार्यकर्त्यापासून उत्तर महाराष्ट्राच्या संघटनात्मक जबाबदारीपर्यंत झालेला त्यांचा प्रवास पक्षातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी मानला जात आहे.


Protected Content

Play sound