
नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद शहराच्या प्रवेशद्वाराला ग्रामदैवत परमपूज्य संत श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव देण्यात आल्याने शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत श्री झिपरू अण्णा महाराज हे नशिराबादकरांचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या नावाने शहराच्या प्रवेशद्वाराला ओळख मिळावी, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. अखेर या मागणीची दखल घेत नशिराबाद नगरपरिषदेने प्रवेशद्वाराला अण्णा महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

नशिराबादच्या ग्रामदैवत संत श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव शहराच्या प्रवेशद्वाराला देण्यात यावे, यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेकडे निवेदन सादर करून मागणी केली होती. नागरिकांच्या धार्मिक भावना आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागणीचा विचार करून नगरपरिषदेने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन तसेच सर्व नगरसेवकांनी यासंदर्भातील ठराव मंजूर केला. त्यानंतर शहराच्या प्रवेशद्वाराला संत श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव देण्यात आले. नगरपरिषदेच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, शहराच्या प्रवेशद्वाराशी ग्रामदैवताचे नाव जोडल्याने नशिराबादच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीला अधिक अधोरेखित करण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. याबाबत ‘लाईव्ह ट्रेंड्स’ने उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, नशिराबादमधील नागरिकांप्रमाणेच नगरपरिषदेतील पदाधिकाऱ्यांचीही संत श्री झिपरू अण्णा महाराजांवर अपार श्रद्धा आहे. त्याच श्रद्धेतून आणि सेवा म्हणून शहराच्या प्रवेशद्वाराला अण्णा महाराजांचे नाव देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रवेशद्वारावरील नामफलकाच्या आकाराबाबतही उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली. भव्य-दिव्य प्रवेशद्वाराच्या तुलनेत सध्या लावण्यात आलेला नामफलक काहीसा छोटा दिसत असल्याचे त्यांनी मान्य केले. मोजमाप घेताना ही बाब लक्षात आली नसल्याचे सांगत, नामफलक बसवल्यानंतर त्याचा आकार अपेक्षेपेक्षा लहान असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात प्रवेशद्वाराच्या भव्यतेला आणि वैभवाला साजेशा पद्धतीने संत श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव अधिक मोठ्या आणि आकर्षक स्वरूपात प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीही उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी दिली. त्यामुळे आगामी काळात प्रवेशद्वारावरील नामफलक अधिक भव्य स्वरूपात पाहायला मिळण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



