
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत प्रतीक्षेत असलेल्या बऱ्हाणपूर-तळोदा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वपूर्ण रस्त्याच्या चौपदरीकरण कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा उद्या, शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता यावल येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

हा महामार्ग मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आणि महाराष्ट्रातून गुजरातला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा व्यापारी आणि वाहतुकीचा मार्ग मानला जातो. यावल शहरातून जाणाऱ्या या महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली होती, ज्यामुळे नागरिक व वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या चौपदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने या परिसराच्या दळणवळणाला आणि विकासाला मोठी गती मिळणार आहे.
यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित या विशेष भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि प्रमुख उपस्थितीत रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे आणि चोपडा मतदारसंघातील आमदार नंदू महाजन यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांमधील वाहतूक अत्यंत जलद आणि सुरक्षित होणार आहे. स्थानिक व्यापार, कृषी उत्पन्न वाहतूक आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास यावल शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी, विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



