



भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, अपात्र झालेल्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रात्री उशीरा शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला असून यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून भुसावळातील राजकारणात नवीन ट्विस्ट आलेला आहे.
अलीकडेच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भुसावळचे माजी नगराध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते अनिल चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. तथापि, शेवटच्या टप्प्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने माघार घेत भाजपच्या उमेदवाराला पाठींबा दिला होता. यामुळे ते लवकरच शिंदे गटात दाखल होतील असे मानले जात होते. या अनुषंगाने काल रात्री उशीरा अनिल चौधरी यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी अलीकडच्या निवडणुकीत शरद पवार गटातर्फे लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आलेल्या आणि सध्या अपात्रतेच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असलेल्या गायत्री चैतन भंगाळे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. लक्षणीय बाब म्हणजे अनिल चौधरी यांचे पुतणे तथा माजी आमदार संतोषभाऊ यांचे सुपुत्र सचिन आणि निखील चौधरी यांनी देखील याप्रसंगी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे भुसावळात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार आहे.
भुसावळ शहराच्या राजकारणात मंत्री संजय सावकारे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्यात कट्टर शत्रूत्व असून आता चौधरी यांच्याच समर्थकांचा एक मोठा गट थेट महायुतीत सहभागी असलेल्या शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. याचे दूरगामी परिणाम होण्याचे संकेत मिळाले आहेत.



