Home प्रशासन रावेर तालुक्यात भूकंपानंतर प्रशासनाची धावपळ ; शाळा-अंगणवाडींसह जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची...

रावेर तालुक्यात भूकंपानंतर प्रशासनाची धावपळ ; शाळा-अंगणवाडींसह जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

0
10


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मोहगण बु. आणि अहीरवाडी परिसरात १ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ७.५७ वाजता ३.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील घरांसह शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे आणि जुन्या शासकीय इमारतींचे तातडीने तांत्रिक सर्वेक्षण करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार नंदकिशोर भागवत महाजन यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार नंदकिशोर महाजन यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांना पत्र दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, या भूकंपाची खोली सुमारे ५ किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत असून, मोहगण बु., अहीरवाडी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता तुलनेने कमी असली तरी भविष्यात अशा प्रकारच्या भूकंपीय हालचालींची पुनरावृत्ती होण्याची शक्यता लक्षात घेणे आवश्यक असल्याचे आमदार महाजन यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ भूकंपानंतरची सद्यस्थिती तपासण्यापुरती कार्यवाही मर्यादित न ठेवता, भविष्यातील संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीच्या दृष्टीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.  मोहगण बु., अहीरवाडी तसेच भूकंपाचे धक्के जाणवलेल्या आसपासच्या गावांमध्ये महसूल, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक पाठवून पाहणी करण्यात यावी, अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे. या पाहणीदरम्यान नागरिकांच्या घरांची तसेच सार्वजनिक वापराच्या इमारतींची प्राथमिक तपासणी करून कुठे तडे, बांधकामातील त्रुटी किंवा अन्य धोके आढळतात का, याचा आढावा घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे

विशेषतः परिसरातील शाळा, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत कार्यालये, विविध शासकीय इमारती तसेच जुन्या आणि धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी आमदार महाजन यांनी केली आहे. या ऑडिटच्या माध्यमातून संबंधित इमारतींची संरचनात्मक स्थिती तपासून आवश्यक दुरुस्ती, मजबुतीकरण किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत निर्णय घेता येणार आहे. दरम्यान, रावेर तालुक्यात भूकंपीय हालचालींचे सातत्याने निरीक्षण करता यावे यासाठी तालुक्यात किंवा भूकंपाच्या दृष्टीने योग्य ठिकाणी स्वतंत्र भूकंप निरीक्षण केंद्र उभारण्याबाबत शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशीही मागणी आमदार महाजन यांनी केली आहे. नियमित निरीक्षणाची यंत्रणा उपलब्ध झाल्यास भविष्यातील भूकंपीय हालचालींबाबत अधिक अचूक माहिती मिळण्यास मदत होईल, असा त्यामागील उद्देश आहे. या सर्व कार्यवाहीचा एकत्रित अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार करून राज्य शासनास सादर करावा आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती आपल्याला द्यावी, अशी विनंतीही आमदार नंदकिशोर महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


Protected Content

Play sound