



अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे शेतशिवारात मका उत्पादक शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. मका पिकावर लष्करी अळीचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यानंतर पडलेला तब्बल २० ते २२ दिवसांचा पावसाचा खंड यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने अखेर आपल्या दोन एकर उभ्या मका पिकावर रोटाव्हॅटर फिरवला.
कळमसरे येथील शेतकरी संजय फकिरा यांच्या दोन एकर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पिकाची चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत गेला. त्यातच पावसाने दीर्घ खंड दिल्याने पिकाला आवश्यक पाणी मिळाले नाही. परिणामी पिकाची वाढ खुंटली आणि उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळू लागल्या. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना सुरुवातीपासूनच मोठा फटका बसला. अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यानंतर तब्बल २० ते २२ दिवसांचा पावसाचा मोठा खंड पडला. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर झाला.
पावसाअभावी मका पिकाची वाढ खुंटली असतानाच लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली. कीड नियंत्रणासाठी औषधांची फवारणी, वाढता खर्च आणि त्यानंतरही अपेक्षित परिणाम न मिळाल्याने उत्पादन खर्च वसूल होण्याबाबतही प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत उभे पीक वाचविण्यापेक्षा शेतात रोटाव्हॅटर फिरवण्याचा कठोर निर्णय संजय फकिरा यांना घ्यावा लागला. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात गोवर्धन येथील शेतकरी दीपक पाटील यांनीही याच संकटामुळे आपल्या उभ्या पिकावर रोटाव्हॅटर फिरवला होता. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचे चित्र स्पष्ट होत आहे.
सातत्याने बदलणारे हवामान, अतिवृष्टी, त्यानंतर पडणारा पावसाचा मोठा खंड आणि पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगामातून अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यातच उत्पादनासाठी केलेला खर्चही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पुढील काही दिवसांत पावसाची परिस्थिती सुधारली नाही तर आणखी काही शेतकरी उभ्या पिकांवर रोटाव्हॅटर फिरवण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या नजरा आता आगामी रब्बी हंगामाकडे लागल्या आहेत. मात्र, त्यासाठीही हवामानाची साथ मिळणे आणि वेळेत पाऊस होणे आवश्यक आहे.



