
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून शनिवार, २९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शालेय परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाला जिल्हाभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, सामाजिक संस्था, महिला बचत गट, युवा मंडळे आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याने या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.

जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, संबंधित गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी अभियानात श्रमदान केले. विशेष म्हणजे विविध गावांतील भजनी मंडळे, महिला बचत गट आणि युवा मंडळांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत शाळा परिसर स्वच्छ करण्यासाठी हातभार लावला.
स्वच्छता अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष मैदानात उतरून श्रमदान केले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अमळनेर तालुक्यातील मालपूर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देत स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांनी शाळा परिसराची पाहणी केली तसेच अभियानात सहभागी झालेले अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि शालेय घटकांचे कौतुक केले.
शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी चोपडा तालुक्यातील अडावद येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित राहून स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला. त्यांनी अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान केल्याने अभियानात सहभागी झालेल्यांचा उत्साह वाढला.
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्गखोल्या, शालेय परिसर, स्वच्छतागृहे आणि परिसरातील इतर सार्वजनिक जागांची स्वच्छता करण्यात आली. अनेक ठिकाणी साचलेला कचरा हटविणे, परिसर स्वच्छ करणे आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक प्रसन्न वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. शाळा ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची केंद्रे असल्याने तेथील परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी असणे आवश्यक आहे, हा संदेश या अभियानातून देण्यात आला.
शिक्षण आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध असून स्वच्छ वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या सर्वांगीण विकासावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे शालेय परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय आणि पर्यावरणाबाबतची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
गावागावांतून मिळालेल्या लोकसहभागामुळे अभियानाला विशेष व्यापकता मिळाली. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थ, महिला बचत गट, युवा मंडळे, भजनी मंडळे आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी श्रमदान केले. त्यामुळे स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेशही या उपक्रमातून प्रभावीपणे पोहोचला.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी अभियानाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, सामाजिक संस्था, महिला बचत गट, युवा मंडळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळा स्वच्छ, सुंदर आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक आरोग्यदायी बनविण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारचा लोकसहभाग कायम राहावा, असे आवाहन त्यांनी केले.



