Home Cities जळगाव नेपाळमध्ये भीषण पुरामुळे जळगावचे नागरिक अडकले असल्यास तातडीने माहिती द्या ; जिल्हा...

नेपाळमध्ये भीषण पुरामुळे जळगावचे नागरिक अडकले असल्यास तातडीने माहिती द्या ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

0
11


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांतील तसेच भारतातील अनेक पर्यटक आणि नागरिक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्यास त्यांची माहिती तातडीने प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक भागांमध्ये दळणवळण आणि जनजीवनावर परिणाम झाला आहे. या परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांचा शोध घेणे, त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळवणे आणि त्यांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरत आहे. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय मुंबई यांच्या माध्यमातून नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील कोणताही नागरिक, पर्यटक किंवा त्यांचे कुटुंबीय या आपत्कालीन परिस्थितीत अडकले असल्यास संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती या लिंकवर नोंदविता येणार आहे.

माहिती नोंदवण्यासाठी लिंक:
नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती नोंदवा

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रोहन घुगे यांनी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, नेपाळमध्ये अडकलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा परिचितांची माहिती वरील ऑनलाइन लिंकवर शक्य तितक्या लवकर भरावी. या माहितीच्या आधारे संबंधित नागरिकांपर्यंत आवश्यक मदत पोहोचविण्यास प्रशासनाला सहकार्य मिळणार आहे.

नागरिकांनी माहिती भरताना संबंधित व्यक्तीचे नाव, संपर्काची माहिती आणि उपलब्ध असलेली इतर आवश्यक माहिती अचूकपणे नोंदवावी, जेणेकरून प्रशासनाला शोध व मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबविता येईल. तसेच परिस्थितीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाल्यास कुटुंबीयांनी प्रशासनाशी संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील नियंत्रण कक्षाचे ०२५७-२२२३१८० / २२१७१९३ हे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध असून, ९३७३७८९०६४ या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधता येईल. नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कोणताही नागरिक किंवा पर्यटक तेथे अडकला असल्यास त्याची माहिती प्रशासनाला तातडीने मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबीयांनी ऑनलाइन लिंकवर माहिती नोंदवून तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतकार्याला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound