
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पैगंबर-ए-इस्लाम हजरत मुहम्मद मुस्तफा ﷺ यांच्या विलादतीच्या मुबारक प्रसंगी साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबी ﷺ निमित्त दावत-ए-इस्लामी हिंदच्या सामाजिक विभाग GNRF (गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन)च्या वतीने देशभरात विविध सामाजिक आणि जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून भुसावळ येथील GNRF टीमने गोदावरी हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फळे तसेच खाद्यपदार्थांची पाकिटे वितरित करून मानवता, सहानुभूती आणि सेवाभावाचा संदेश दिला.

ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून गरजू आणि उपचार घेत असलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये फळे व खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. धार्मिक सणाच्या निमित्ताने समाजातील गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. दावत-ए-इस्लामी जलगाव जिल्हाध्यक्ष जुबैर अत्तारी यांनी सांगितले की, GNRFच्या माध्यमातून देशाच्या विविध भागांमध्ये रुग्णालये, अनाथालये आणि कारागृहांमध्ये सामाजिक सेवा उपक्रम राबविले जात आहेत. या ठिकाणी रुग्ण, अनाथ मुले आणि कैद्यांना फळे तसेच खाद्यपदार्थांची पाकिटे वितरित केली जात आहेत. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी मोफत वैद्यकीय शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात येत आहे. समाजात मानवता, दया, प्रेम, न्याय आणि परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागावी, या उद्देशाने विविध शहरांमध्ये मोठे होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावण्यात येत आहेत. पैगंबर-ए-इस्लाम ﷺ यांच्या जीवनातील मानवतावादी आणि सामाजिक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे.
GNRFचे जिल्हाध्यक्ष रफीक रोशन यांनी सांगितले की, सामाजिक सेवांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांमध्ये बंधुभाव, सहानुभूती आणि मानवतेची भावना अधिक दृढ करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत, सेवा आणि भल्याचा संदेश पोहोचावा, यासाठी स्वयंसेवक सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. भुसावळमधील या सेवाभावी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शोएब अत्तारी, अब्दुल सईद, सय्यद साबीर, युसूफ खान, हाजी तनवीर, फरीद शेख, आबिद शेख, अली शेख, अहमद रजा, शेख कारी इदरीस, अबू सलीम, मौलाना जुल्फिकार, दानिश कुरेशी आणि हाफिज कासिम यांच्यासह GNRFच्या स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.



