
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र कोथळी येथे अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला बुधवारी (२६ ऑगस्ट) भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान श्री संत मुक्ताई जुन्या मंदिराच्या सानिध्यात हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.

सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सकाळी ८.३० वाजता श्री संत मुक्ताई जुने मंदिर, कोथळी येथून भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात निघालेली ही दिंडी वाजत-गाजत कार्यक्रमस्थळी असलेल्या श्री सोमेश्वर मंदिरापर्यंत पोहोचली. ग्रंथ दिंडीच्या आगमनानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले आणि त्यानंतर श्रीमद्भागवत कथा व प्रवचन कार्यक्रमाला अधिकृत सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ह.भ.प. रमेश महाराज आडविहिरकर यांनी प्रवचनातून उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले, तर ह.भ.प. बाळूजी पाडोळे महाराज यांच्या कीर्तनाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. संत परंपरा, अध्यात्म आणि नामस्मरणाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक संदेश देण्यात आला.
श्रावण शुक्ल त्रयोदशीपासून सुरू झालेल्या या सोहळ्यामुळे श्रीक्षेत्र कोथळी आणि परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून, वारकरी बांधवांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या सप्ताहात सहभागी होत आहेत. सतपंथ आचार्य प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आणि श्री संत मुक्ताई चरित्रकार ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली या धार्मिक सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी आमदार एकनाथराव खडसे, सौ. मंदाकिनी एकनाथराव खडसे, श्रीमती रक्षा निखिल खडसे, सौ. शारदाताई गिरीश चौधरी, सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब पाटील, ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यास वारकरी बांधव आणि हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे धार्मिक वातावरणासोबतच संत मुक्ताईंच्या आध्यात्मिक परंपरेचा जागरही होत आहे. सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती, विष्णुसहस्रनाम, श्री संत मुक्ताई चरित्र वाचन, संगीत श्रीमद्भागवत कथा तसेच सायंकाळी हरिपाठ आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांमधून भाविकांना अध्यात्मिक अनुभूती घेता येणार आहे.



