Home Cities जळगाव ईद-ए-मिलादुन्नबीच्या मरकझी जुलूसमध्ये २० हजार मुस्लिम बांधवांचा सहभाग

ईद-ए-मिलादुन्नबीच्या मरकझी जुलूसमध्ये २० हजार मुस्लिम बांधवांचा सहभाग

0
16


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘सरकार की आमद मरहबा’, ‘रसूल की आमद मरहबा’, ‘नारे तकबीर अल्लाहू अकबर’ अशा घोषणांनी जळगाव शहर बुधवारी (२६ ऑगस्ट) दुमदुमून गेले. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त अहेले सुन्नत वल जमात, सर्व आशिकाने रसूल आणि सुन्नी जामा मस्जिद जळगाव यांच्या वतीने भव्य मरकझी जुलूसे ईद-ए-मिलादुन्नबी काढण्यात आला. या जुलूसमध्ये शहरातील विविध भागांतील सुमारे २० हजार मुस्लिम बांधव सहभागी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी १० वाजता शहरातील विविध भागांतून आलेले जुलूस भिलपुरा येथील इमाम अहमद रझा चौकात एकत्र आल्यानंतर मरकझी जुलूसला सुरुवात झाली. इमाम अहमद रझा चौकातून निघालेला हा जुलूस घाणेकर चौक, सुभाष चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, नेरी नाका, पांजरापोळ मार्गे अजिंठा रोडवरील एस.टी. वर्कशॉपसमोरील मुस्लिम कब्रस्तान येथे पोहोचला.

जुलूसच्या अग्रभागी घोडेस्वार सहभागी झाले होते, तर सजविलेल्या बग्गीत मुस्लिम धर्मगुरू विराजमान होते. सहभागी बांधवांच्या हातात इस्लामी ध्वज होते. जुलूसमध्ये ‘नारे तकबीर अल्लाहू अकबर’, ‘नारे रिसालत या रसूलल्लाह’, ‘सरकार की आमद मरहबा’, ‘रसूल की आमद मरहबा’, ‘मक्की की आमद मरहबा’ अशा घोषणा देण्यात आल्या. अनेक भाविक नातेपाक आणि सलातो-सलाम म्हणत जुलूसमध्ये सहभागी झाले होते.

सुभाष चौकात जुलूस पोहोचल्यानंतर परंपरेनुसार अझान देण्यात आली. यावेळी प्रशासनाच्या वतीने जुलूसमध्ये सहभागी मुस्लिम बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, दीपक जोशी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. पोलिसांच्या स्वागतामुळे जुलूसदरम्यान सौहार्दपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. जुलूसच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. सहभागी बांधवांसाठी ठिकठिकाणी स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलवर मिठाई, नानकटाई, केक, पेस्ट्री, केळी, विविध फळे, पोहे, जिलेबी तसेच सरबत आणि पिण्याचे पाणी वितरित करण्यात आले. त्यामुळे जुलूसमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना विविध ठिकाणी अल्पोपहार आणि शीतपेयांची व्यवस्था उपलब्ध झाली.

मरकझी जुलूसमध्ये सुन्नी जामा मस्जिद जळगाव आणि मरकझी जुलूसे ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांच्यासह मौलाना जाबीर रझा, मौलाना नजमूल हक मिसबाही, मौलाना वासेफ रझा, मौलाना अब्दुल रहीम कादरी, मौलाना नौशाद साबरी, मौलाना तनवीर नुरी, मौलाना सलीम रझा, मौलाना हसन रझा, मौलाना अहमद रझा, मुश्ताक भिस्ती, सय्यद जावेद, अमान बिलाल, कामिल खान, सय्यद उमर, मुस्तफा भिस्ती, जावेद भाया, मुबारक जाकीर, तुराब शाह, निझाम पहलवान, एजाज लाला, अरबाज खान, काशिफ टेलर, शाकीर चित्तलवाला आदींची उपस्थिती होती. भिलपुरा, इस्लामपुरा, काट्या फैल, मासूमवाडी, कासमवाडी, शाहूनगर, मुगल गार्डन, हजरत उमर कॉलनी, चिश्तिया पार्क, उस्मानिया पार्क, गेंदालाल मिल, अमान पार्क, के.जी.एन. कॉलनी, ए.बी. कॉलनी, मरियम पार्क, मास्टर कॉलनी, हुडको, भारत नगर, लक्ष्मीनगर, सय्यद असरार नगर, सालार नगर, बागवान मोहल्ला, मणियार मोहल्ला, भिस्ती मोहल्ला आणि इंदिरानगर आदी भागांतील मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी झाले.

जुलूस कब्रस्तान येथे पोहोचल्यानंतर कमिटीचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी जळगाव जिल्हा पोलीस दल आणि जळगाव शहर महानगरपालिकेचे सहकार्याबद्दल आभार मानले. ईद-ए-मिलादचा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करताना कायद्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या सुन्नती कार्यपद्धतीतून मार्गदर्शन घेऊन त्यानुसार जीवन जगण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मौलाना जाबीर रझा यांनी प्रवचन केले, तर मौलाना नजमूल हक यांनी दुआ केली. नातेपाक आणि सलातो-सलाम पठणानंतर दुपारी १ वाजता जुलूसची सांगता करण्यात आली. ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने सुन्नी जामा मस्जिद येथे ‘मुहे मुबारक शरीफ’चे दर्शन भाविकांना घडविण्यात आले.


Protected Content

Play sound