
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विश्व संस्कृत दिनाचे औचित्य साधून जळगाव महानगरस्तरीय ‘श्री आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा–२०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार जी. बेंडाळे यांच्या प्रेरणा, संकल्पना आणि मार्गदर्शनातून आयोजित या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते.

संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती आणि समृद्ध ज्ञानपरंपरेची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, शुद्ध उच्चार, पाठांतर, आत्मविश्वास आणि संस्कृतप्रेम वाढावे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जळगाव शहरातील विविध शाळांमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. एकूण ३४२ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. नववीच्या गटात ९ संघ, तर दहावीच्या गटात १६ संघ सहभागी झाले. याशिवाय २६ वादक आणि २९ संघव्यवस्थापक उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद भवन येथे विद्यार्थ्यांच्या सामूहिक, लयबद्ध आणि भावपूर्ण स्तोत्रपठणाने परिसर संस्कृतमय झाला. नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘श्रीकृष्णाष्टकम् स्तोत्रम्’, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘श्रीरुद्राष्टकम् स्तोत्रम्’ निश्चित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शुद्ध उच्चार, योग्य स्वर-लय, गती, भावपूर्ण सादरीकरण आणि आत्मविश्वासपूर्ण शैलीत स्तोत्रांचे पठण केले.
स्पर्धेचे उद्घाटन खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्राचार्य डॉ. अशोक राणे यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. केतन नारखेडे होते. यावेळी प्रा. आर. बी. ठाकरे, प्रा. स्वाती बऱ्हाटे, उपप्राचार्या प्रा. राजश्री महाजन, पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे, प्रा. उमेश पाटील, प्रा. गुणवंत वंजारी, संस्कृत अध्यापक प्रा. अर्जुनशास्त्री मेटे तसेच आयोजक प्रा. महेंद्र राठोड आणि शोभना कावळे उपस्थित होते.
यज्ञप्रज्वलन, मंत्रोच्चार आणि शंखध्वनीने कार्यक्रमाचा मंगलमय शुभारंभ झाला. प्रा. मयुरी हरिमकर व संगीत विभागाच्या चमूने सादर केलेल्या स्वागतगीताने वातावरण प्रसन्न झाले. प्रा. महेंद्र राठोड यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची संकल्पना, उद्दिष्टे आणि संस्कृत संवर्धनातील उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी विद्यार्थी जीवनात संस्कृतीचा जागर घडवायचा असेल तर संस्कृत भाषा जिवंत ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. मानवी मूल्यांचे जतन आणि संस्कृती संवर्धनात संस्कृत भाषेचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. प्राचार्य डॉ. केतन नारखेडे यांनी भारतीय संस्कृतीचे जतन आणि तिची मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले. उपप्राचार्या प्रा. राजश्री महाजन यांनी महाविद्यालयाची यशस्वी परंपरा आणि विविध उपक्रमांची माहिती दिली.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. अमिता निकम, प्रा. मयुरी हरिमकर, प्रा. शुभांगी बडगुजर आणि प्रा. लक्ष्मण नागटिळक यांनी केले. शास्त्रशुद्ध उच्चार, पाठांतर, स्वर-लय-गती, भावपूर्ण सादरीकरण, आत्मविश्वास आणि प्रतिसाद या निकषांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभासाठी के.सी.ई. सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
इयत्ता नववी गटात प्रथम क्रमांक कै. श्रीमती ब. गो. शानबाग माध्यमिक विद्यालय, द्वितीय क्रमांक नानासाहेब आर. बी. पाटील विद्यालय व ए. टी. झांबरे शाळा यांचा संयुक्त संघ, तर तृतीय क्रमांक विवेकानंद प्रतिष्ठान संचलित इंग्लिश मीडियम विद्यालय व एस. एल. चौधरी स्कूल यांच्या संयुक्त संघाने पटकावला. प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व माध्यमिक स्कूलला, तर द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक ओरियन स्टेट बोर्ड स्कूलला मिळाले.
इयत्ता दहावी गटात प्रथम क्रमांक विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, द्वितीय क्रमांक कै. ॲड. अच्युतराव अत्रे इंग्लिश मीडियम स्कूल व ओरियन स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त संघाने, तर तृतीय क्रमांक काशीनाथ पलोड पब्लिक स्कूल व कै. श्रीमती ब. गो. शानबाग विद्यालय यांच्या संयुक्त संघाने मिळविला. प्रथम उत्तेजनार्थ नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय, तर द्वितीय उत्तेजनार्थ ओरियन सीबीएसई स्कूल ठरले.
प्रथम क्रमांकासाठी १,५०१ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १,००१ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ७०१ रुपये रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र व विद्यालयासाठी सन्मानचिन्ह देण्यात आले. दोन्ही उत्तेजनार्थ विजेत्या संघांना प्रत्येकी ५०१ रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. दोन्ही गटांमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या कै. श्रीमती ब. गो. शानबाग विद्यालयाला ‘डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे फिरता चषक’ प्रदान करण्यात आला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धाप्रमुख प्रा. महेंद्र राठोड, स्पर्धा उपप्रमुख प्रा. एस. एस. कावळे आणि संस्कृत शिक्षक प्रा. अर्जुनशास्त्री यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थी प्रतिनिधी कु. रिया पाटील, शिक्षक प्रतिनिधी सौ. हर्षदा उपासनी आणि परीक्षक सौ. अमिता निकम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपम निळे, प्रा. संध्या महाजन आणि प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी केले.
संस्कृत भाषेप्रती विद्यार्थ्यांमध्ये प्रेम निर्माण करण्यासोबतच भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणारा हा उपक्रम ठरला. स्तोत्रपठणामुळे विद्यार्थ्यांच्या उच्चारकौशल्य, स्मरणशक्ती, सादरीकरणकौशल्य आणि आत्मविश्वासाला चालना मिळाली. अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार जी. बेंडाळे यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनातून सुरू झालेला हा उपक्रम संस्कृत संवर्धनाला नवी दिशा देणारा ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.



