
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावर प्रजापती नगराजवळ सोमवारी कावड यात्रेदरम्यान भीषण अपघाताची घटना घडली. देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या आठ वर्षीय मुलाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर ममुराबाद रस्त्यावर भाविकांची वर्दळ होती. याचदरम्यान प्रजापती नगराजवळील देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या आठ वर्षीय मुलाला भरधाव ट्रकने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. संतप्त जमावाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकला आग लावली. ट्रक पेटल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पेटलेला ट्रक विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, संतप्त जमावाकडून ट्रकची आग विझविण्यास विरोध करण्यात आल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली. दरम्यान, अपघातात ट्रक चालकही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र, संतप्त जमावाने ट्रक चालकाला तात्काळ घटनास्थळी आणून आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. मृत बालकाचा मृतदेह रस्त्यावर ठेवून जमावाकडून या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेण्यात आली.
घटनेनंतर ममुराबाद रस्त्यावर काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. संतप्त नागरिकांची समजूत काढत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. कावड यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी असताना भरधाव वाहनामुळे हा अपघात झाल्याने सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अपघाताचे नेमके कारण, ट्रकचा वेग आणि चालकाची स्थिती याबाबत पोलीस तपासानंतर अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.



