Home आरोग्य स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

0
24


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मू. जे. स्वायत्त महाविद्यालयांतर्गत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक प्रा. शिल्पा सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. लोकेश चौधरी आणि डॉ. शीतल ढेवले यांनी विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली. तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेत त्यांना आवश्यक औषधोपचार तसेच पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार फार्मसिस्ट स्वाती इंगळे आणि दीप्ती वावीकर यांनी मोफत औषधांचे वितरण केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी तपासणी, औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. यावेळी डॉ. लोकेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पौगंडावस्थेतील मानसिक अवस्था, शारीरिक वाढ आणि विकास याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या वयात शरीरात होणारे बदल, मानसिक आरोग्याची काळजी आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. योग्य व संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे तसेच जंक फूडचे सेवन टाळणे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सल्ले दिले.

यासोबतच शासकीय रुग्णालयामार्फत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आरोग्य योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. नेत्ररोग, दंतरोग आणि हृदयरोग निदानासह विविध आजारांवरील उपचार व मोफत शस्त्रक्रियांच्या सुविधांबाबतही विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले. शिबिरात विद्यार्थ्यांची नेत्र, दंत आणि त्वचारोग तपासणी करण्यात आली. पावसाळ्यात वाढणारे सर्दी, खोकला यांसारखे विषाणूजन्य आजार तसेच इतर आरोग्यविषयक समस्या तपासण्यात आल्या. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध आरोग्यविषयक गरजांचा विचार करून शिबिर राबविण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच आजारांचे वेळीच निदान आणि योग्य उपचार घेण्याचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित झाले. महाविद्यालयीन जीवनात शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहणे आवश्यक असल्याने अशा आरोग्य शिबिरांचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत असल्याचे दिसून आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. किरण महाजन यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. श्रद्धा पाटील, समन्वयक प्रा. उमेश पाटील, प्रा. गुणवंत वंजारी तसेच सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound