Home Cities जळगाव गोलाणी मार्केटमध्ये महापालिकेची धडक स्वच्छता मोहीम ; अतिक्रमण, अनधिकृत फलकांवर कारवाईचा आयुक्तांचा...

गोलाणी मार्केटमध्ये महापालिकेची धडक स्वच्छता मोहीम ; अतिक्रमण, अनधिकृत फलकांवर कारवाईचा आयुक्तांचा इशारा

0
13


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मध्यवर्ती गोलाणी मार्केट परिसरात रविवारी, २३ ऑगस्ट रोजी सकाळी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त आदित्य जिवने (भा.प्र.से.) यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण, अनधिकृत फलक तसेच गाळेधारकांच्या विविध समस्यांचा आढावा घेतला. परिसरातील वाढीव अतिक्रमण आणि सार्वजनिक जागेतील अडथळ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

स्वच्छता मोहिमेदरम्यान गोलाणी मार्केटमधील दुकानांसमोरील वाढीव ओटे, अनधिकृत बोर्ड, फ्लेक्स आणि इतर साहित्यामुळे नागरिक व ग्राहकांना ये-जा करताना होणाऱ्या अडथळ्यांची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली. संबंधित अतिक्रमणे तसेच अवास्तव फलक तातडीने हटवावेत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मार्केट परिसरातील सार्वजनिक जागा व्यापारी वापरासाठी अनधिकृतपणे अडविल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. दुकानांसमोरील जागा मोकळी ठेवणे, नागरिकांना सुरळीतपणे ये-जा करता येईल अशी व्यवस्था करणे आणि बाजारपेठेचा परिसर सुव्यवस्थित ठेवणे ही गाळेधारकांचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. गोलाणी मार्केटमधील ज्या गाळेधारकांकडे महानगरपालिकेची वसुली किंवा भाड्याची रक्कम थकीत आहे, त्यांनी ती तातडीने भरावी, असे निर्देश आयुक्त जिवने यांनी दिले. थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्या गाळेधारकांवर नियमानुसार गाळे सील करण्याची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

मार्केट परिसरात विविध ठिकाणी लोंबकळणाऱ्या केबल वायर तसेच अनावश्यक आणि अवास्तव साहित्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचीही आयुक्तांनी पाहणी केली. सार्वजनिक जागेत अडथळा निर्माण करणाऱ्या केबल वायर व इतर साहित्य तातडीने हटवून परिसर मोकळा करण्याच्या सक्त सूचना संबंधितांना देण्यात आल्या. सार्वजनिक जागा अडथळेमुक्त ठेवण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. गोलाणी मार्केट परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक गाळेधारकाने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. दुकानासमोर किंवा सार्वजनिक परिसरात कचरा टाकणाऱ्या गाळेधारकांवर घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाच्या अनुषंगाने दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून व्यापारी, गाळेधारक आणि नागरिकांनीही त्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. बाजारपेठेत कचरा निर्माण होणार नाही आणि निर्माण झालेला कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाटीस दिला जाईल, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले. दरम्यान, गोलाणी मार्केट परिसरातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, थकीत वसुली आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त आदित्य जिवने यांनी दिल्याने आगामी काळात या परिसरातील महापालिकेची कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound