
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील कलात्मक कौशल्य विकसित करणे, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व रुजविणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

या कार्यशाळेत प्रसिद्ध मूर्तिकार शिवम अनूप सुतार यांनी विद्यार्थ्यांसमोर शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. गणेशमूर्ती घडविण्याची पद्धत, मूर्ती तयार करताना आवश्यक असणारे बारकावे तसेच शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तीचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
प्रात्यक्षिकानंतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्वतःच्या हाताने विविध आकार व स्वरूपातील सुंदर गणेशमूर्ती तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ मूर्तीकलेचा अनुभव मिळाला नाही, तर स्वतःच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला प्रत्यक्ष कलाकृतीच्या माध्यमातून व्यक्त करण्याची संधीही मिळाली.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, संचालक रमेश खाचणे आणि महेश पाटील यांनी कार्यशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करत त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची आपल्या घरी स्थापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करणे गरजेचे असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण करत गणेशोत्सव अधिक आनंददायी, सुरक्षित आणि निसर्गपूरक पद्धतीने साजरा करण्याचे महत्त्वही उपस्थितांनी स्पष्ट केले.
या वेळी शाळेचे प्राचार्य विकास चौधरी, उपमुख्याध्यापिका वंदना शिर्के, पर्यवेक्षक विलास बऱ्हाटे, कैलास कव्हळे आणि संजीव वाढे उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन कलाशिक्षक हेमंतकुमार बाऊस्कर, अर्चना भोळे आणि मनोज सुरवाडे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने गणेशमूर्ती निर्मितीत सहभाग घेतला.



