Home Cities जळगाव ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची जय्यत तयारी ; ७ हजारांहून अधिक पोलीस, होमगार्ड...

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची जय्यत तयारी ; ७ हजारांहून अधिक पोलीस, होमगार्ड व सुरक्षा यंत्रणा तैनात

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक सुरक्षा नियोजन केले आहे. सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा, तसेच मिरवणुकीदरम्यान नागरिकांची सुरक्षितता व वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी २२ ऑगस्ट रोजी जळगाव पोलीस मुख्यालयात शांतता समिती सदस्य आणि मिरवणूक पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

या बैठकीस जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच उपविभागीय दंडाधिकारी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते. यावेळी ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला तसेच मिरवणूक आयोजक व नागरिकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. मिरवणूक काढण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून, परवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक काढू नये, असे स्पष्ट करण्यात आले. प्रशासन व पोलिसांनी निश्चित केलेल्या मिरवणूक मार्गात कोणताही बदल करू नये, तसेच मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणी, घोषणा किंवा वक्तव्ये टाळावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या किंवा आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, व्हिडिओ अथवा संदेश प्रसारित करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच परदेशातील राष्ट्रांचे झेंडे अथवा अन्य वादग्रस्त ध्वज वापरण्यास मनाई राहणार आहे. मिरवणुकीचे शिस्तबद्ध आयोजन करण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.मिरवणुकीत झेंडे फिरविणे टाळावे, कारण त्यातून अनावश्यक वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने सर्वांनी संयम बाळगावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले. मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी परिस्थितीनुसार वाहतूक मार्गात तात्पुरते बदल किंवा डायव्हर्शन करण्यात येणार आहे.

मागील वर्षी ईदच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात सात गुन्हे दाखल झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि ईदचा सण पूर्णपणे शांततेत पार पडावा, यासाठी नागरिकांनी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. सुरक्षेसोबतच मूलभूत सुविधांकडेही प्रशासनाने लक्ष दिले आहे. महावितरणकडून उघडे डीपी बंदिस्त करणे, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे तसेच धोकादायक वायरिंगची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेला मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे आणि आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

ईद सणाच्या बंदोबस्तासाठी जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये १ पोलीस अधीक्षक, १० अपर पोलीस अधीक्षक/SDPO/प्रोबेशनरी DySP, ३० पोलीस निरीक्षक, २०० API/PSI, ३,४०० पोलीस अंमलदार, ८ RCP, १५ स्ट्राइकिंग फोर्स, १,६०० होमगार्ड, १०० वाहतूक शाखेचे कर्मचारी, २०० SRPF कमांडो, २ BDDS पथके आणि ४ डांग युनिट यांचा समावेश आहे. याशिवाय कंट्रोल रूम मॉनिटरिंगसाठी १५ आणि सोशल मीडिया/सायबर मॉनिटरिंगसाठी १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आणि सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील आवश्यक बैठका पूर्ण करण्यात आल्या असून संवेदनशील आणि महत्त्वाच्या भागांमध्ये रूट मार्च घेण्यात येत आहेत. दंगल काबू योजना व त्याची रिहर्सल पूर्ण करण्यात आली असून, जिल्ह्यात ५ हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत निगराणी ठेवण्यात येत असून, मिरवणूक आणि गर्दीच्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. DJ संदर्भात संबंधित पदाधिकारी व आयोजकांच्या स्वतंत्र बैठका घेऊन आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. तसेच MSEDCL, PWD, आरोग्य विभाग, महानगरपालिका आणि अन्य संबंधित यंत्रणांना आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

ईद हा शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढविणारा सण असल्याने सर्वांनी एकत्रितपणे तो साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. मिरवणुकीतील आयोजक, पदाधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी प्रशासन व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कायद्याचे उल्लंघन किंवा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतीची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.


Protected Content

Play sound