यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव शिवारात तीन वर्षे सहा महिन्यांच्या दृष्टिहीन बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला अपघात म्हणून नोंदविण्यात आली होती. मात्र, पोलिसांना घटनेबाबत संशय आल्याने करण्यात आलेल्या सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. बालकाची आई आणि ७० टक्के दृष्टिहीन असलेल्या सरस्वती पाटील यांच्या तक्रारीवरून आता बालकाच्या हत्येचा तसेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पती स्वप्निल पाटील आणि सासू आशाबाई पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास किनगाव शिवारातील आरोपींच्या मालकीच्या शेतातील विहिरीत सरस्वती पाटील आणि त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा कृष्णा पाटील पडल्याची घटना घडली होती. या घटनेत सरस्वती जखमी झाल्या, तर त्यांचा मुलगा कृष्णा याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघाती असल्याचे मानून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

घटनेनंतर जखमी सरस्वती यांना उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांना कोणताही जबाब दिला नव्हता. बालकाचा अंत्यविधी झाल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी घटनेच्या पार्श्वभूमीवर सरस्वती यांची सखोल विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी दिलेल्या तक्रारीत ही घटना अपघात नसून आपल्याला आणि मुलाला विहिरीत ढकलण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. सरस्वती यांच्या तक्रारीनुसार, त्या आणि त्यांचे पती स्वप्निल हे दोघेही दृष्टिहीन आहेत. त्यांच्या मुलालाही जन्मतःच दृष्टिदोष होता. मुलगा अंध असल्याचे डॉक्टरांनी सोनोग्राफीदरम्यान सांगितल्यानंतर पती स्वप्निल यांनी गर्भपात करण्यास सांगितले होते. मात्र, सरस्वती यांनी मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. या कौटुंबिक वादातून सरस्वती सुमारे अडीच वर्षे माहेरी राहत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
१३ जुलै रोजी सरस्वती आणि त्यांचे पती शेतातील विहिरीची पूजा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सासू आशाबाई भागवत पाटील यांनी सरस्वती आणि त्यांच्या मुलाला धक्का देऊन विहिरीत पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विहिरीतील लाकडी फाउंडेशनचा आधार मिळाल्याने सरस्वती यांचा जीव वाचला; मात्र त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा कृष्णा पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. या घटनेत पती स्वप्निल याचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सरस्वती स्वप्निल पाटील, (वय २७), रा. किनगाव यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्वप्निल भागवत पाटील, (वय ३४), तसेच आशाबाई भागवत पाटील (वय ६०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेने किनगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या घटनेमागे कौटुंबिक वादातून हत्या आणि महिलेच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पोलिसांच्या तपासातून या घटनेमागील नेमके कारण आणि आरोपींची भूमिका अधिक स्पष्ट होणार आहे.



