रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यात सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेच्या मतदार यादीत स्थान मिळविण्यासाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमधून ठराव करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याने गावागावातील सहकाराचे राजकारण ढवळून निघाले आहे. विशेषतः शंभर टक्के वसुली असलेल्या सोसायट्यांकडे इच्छुकांचा मोर्चा वळल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक पुढील काही महिन्यांत होण्याची शक्यता असल्याने गावपातळीवरून विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे ठराव जिल्हा बँकेकडे पाठविण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठका, सभासदांच्या चर्चा आणि संभाव्य प्रतिनिधींच्या हालचालींना वेग आला आहे. रावेर तालुक्यात सुमारे २९ विकासो सोसायट्यांची शंभर टक्के वसुली झालेली असल्याचे सांगितले जात आहे. तर काही सोसायट्या ‘अनिष्ट तफावती’मध्ये असल्याने त्या सोसायट्यांमधून जिल्हा बँकेसाठी ठराव करून घेण्यास इच्छुकांना अडचणी येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही इच्छुकांनी स्वतःच्या सोसायटीऐवजी शंभर टक्के वसुली असलेल्या इतर गावांतील सोसायट्यांकडे लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जात आहे.

स्वतःच्या सोसायटीची शंभर टक्के वसुली पूर्ण झालेली नसताना इतर गावातील शंभर टक्के वसुली असलेल्या सोसायट्यांमधून ठराव करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने स्थानिक सभासदांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. बाहेरील प्रतिनिधीच्या बाजूने आपल्या सोसायटीतून ठराव करण्याच्या हालचालींबाबत काही सभासदांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे गावपातळीवरील संचालकीय राजकारणाला आणखी धार आली आहे. दरम्यान, प्रत्येक गावात ‘आपल्या सोसायटीतून कोणाचा ठराव झाला?’, ‘संचालकांची मते कोणाच्या बाजूने वळली?’ आणि ‘कोणत्या इच्छुकाने कुठे फिल्डिंग लावली?’ याची चर्चा सुरू झाली आहे. काही राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या गावांमध्ये येत्या काही दिवसांत ठराव होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांच्या हालचाली आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
आपल्या बाजूने ठराव करून घेण्यासाठी काही ठिकाणी संचालकांना सहलीवर नेण्यापासून विविध प्रकारच्या प्रयत्नांची चर्चा सहकार क्षेत्रात रंगली आहे. या चर्चांना अधिकृत दुजोरा नसला तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांचे ठराव महत्त्वाचे ठरणार असल्याने गावागावातील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या मतदार यादीत स्थान मिळविण्यासाठी सुरू असलेल्या या चढाओढीमुळे ‘सहकार की राजकारण?’ असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कोणत्या सोसायटीचा पाठिंबा कोणाला मिळतो, कोणाचे ठराव वैध ठरतात आणि ऐनवेळी कोणाला धक्का बसतो, यावर आगामी निवडणुकीतील समीकरणे अवलंबून राहणार आहेत.



