Home Cities जळगाव मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’चे रविवारी प्रकाशन

मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’चे रविवारी प्रकाशन

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावचे साहित्यिक मिथुन ढिवरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’ या सहाव्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांचे निरूपणपर स्पष्टीकरण या पुस्तकातून मांडण्यात आले असून, संत तुकारामांच्या विचारांचा आणि अभंगवाणीचा अर्थ सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या साहित्यकृतीत करण्यात आला आहे.

मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमाणसांतील तुकोबा भाग एक’ या पुस्तकाचे प्रकाशन गेल्या वर्षी मार्च महिन्यात झाले होते. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादानंतर संत तुकाराम महाराजांच्या निवडक अभंगांचे अधिक सखोल विवेचन करणारा दुसरा भाग आता वाचकांच्या भेटीला येत आहे. संत तुकारामांच्या अभंगांमधील सामाजिक, आध्यात्मिक आणि मानवी मूल्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या लेखनातून करण्यात आला आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन साहित्यिका अस्मिता मेश्राम ‘पुष्पांजली’, भंडारा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे ह. भ. प. दीपक महाराज पाटील शेळगावकर तसेच अथर्व पब्लिकेशन्सचे प्रकाशक युवराज माळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धांडे फाउंडेशनचे संचालक नेमीवंत धांडे राहणार आहेत.

पुस्तक प्रकाशन सोहळा रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान ऑर्बिट क्लासेस, गिरणा टाकी रोड, पोस्टल कॉलनीच्या मागे, लक्ष्मीनगर, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यासह शहरातील साहित्यिक, वाचक, पुस्तकप्रेमी आणि संत साहित्याचे अभ्यासक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लेखक मिथुन ढिवरे यांनी केले आहे. 


Protected Content

Play sound