Home Cities अमळनेर अतिवृष्टीग्रस्त अमळनेरकरांना दिलासा ! ५० लाभार्थींना किराणा किटचे वाटप

अतिवृष्टीग्रस्त अमळनेरकरांना दिलासा ! ५० लाभार्थींना किराणा किटचे वाटप

0
13

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचा हात देत शंकरनगर, गुरुकृपा कॉलनी आणि संताजीनगर परिसरातील सुमारे २५० लाभार्थींना जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप करण्यात आले. ही मदत मिळाल्याने पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अमळनेर शहरात अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. बोरी नदी तसेच पिंपळे नाला परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषद हद्दीतील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यापूर्वी सुमारे १८०० पूरग्रस्त नागरिकांना माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले होते. मात्र, काही पूरग्रस्त नागरिक या मदतीपासून वंचित राहिल्याची बाब राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे आणि नगरसेवक सचिन पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर आमदार अनिल पाटील यांनी प्रशासनाला मदतीचे किट वाढवून वंचित लाभार्थींनाही त्याचा लाभ देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार २० ऑगस्ट रोजी शंकरनगर, गुरुकृपा कॉलनी आणि संताजीनगर परिसरातील सुमारे २५० लाभार्थींना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

पिंपळे रोडवरील शंकरनगर परिसरातील श्रीरंग कॉलनी येथे माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते १४६ लाभार्थींना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक सचिन पाटील आणि नगरसेविका योगिता कापडणेकर उपस्थित होते. दरम्यान, बाजार समितीच्या मागील बाजूस असलेल्या गुरुकृपा कॉलनी आणि संताजीनगर परिसरात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुमारे १०० लाभार्थींना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, वेद राजेश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


Protected Content

Play sound