जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे संविधानाने नागरिकांना दिलेल्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप करत भारतीय विद्यार्थी मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने गुरुवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरणामुळे बहुजन, वंचित आणि गोरगरीब घटकातील विद्यार्थ्यांचे मोफत शिक्षण धोक्यात आले असल्याचे सांगत, आंदोलकांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राष्ट्रीय संरक्षक तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार देशभरातील विविध जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाचा दुसरा टप्पा पार पडला. जळगावातील हे आंदोलन भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न वारडे आणि भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले.
धरणे आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांवर ठाम भूमिका मांडली. मतदानाची पारदर्शकता आणि विश्वसनीयता टिकवण्यासाठी ईव्हीएम पद्धतीत तातडीने सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच देशात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी केवळ मंत्र्यांचा राजीनामा पुरेसा नसून संपूर्ण प्रकरणाची व राष्ट्रीय परीक्षा समितीची (NTA) उच्चस्तरीय चौकशी करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. यासोबतच वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार थांबवणे, दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीची निष्पक्ष चौकशी करणे आणि शिक्षण संस्थांचे खाजगीकरण थांबवून खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करणे या मुद्द्यांवर आंदोलकांनी विशेष भर दिला.
राष्ट्रीय शिक्षण धोरणात (NEP) विद्यार्थी हित लक्षात घेऊन आवश्यक बदल करण्यात यावेत, २०११ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांसाठी ‘टीईटी’ (TET) परीक्षा घेण्यात यावी, केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त पदांवर नवीन नोकरभरती तातडीने राबवण्यात यावी आणि देशभरात सर्वांसाठी ‘समान शिक्षण व्यवस्था’ लागू केली जावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात सुमित्र अहिरे, सुनील देहडे, खुशाल सोनवणे, प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, प्रा. डॉ. एस. एस. राणे, इंजि. डी. एन. पाटील, प्रा. एन. व्ही. भारंबे, आकाश लोंढे, सुमित भालेराव, मुकेश सावकारे, मयुर तायडे यांच्यासह बहुसंख्येने विद्यार्थी, प्राध्यापक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



