फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांनी जीवनात यश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन आमदार अमोल जावळे यांनी केले. फैजपूर येथील लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे चेअरमन नरेंद्र नारखेडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी बबनराव काकडे, माजी आमदार अरुणदादा पाटील आणि तंत्र वैदिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. आमदार अमोल जावळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना यशासाठी केवळ शिक्षण पुरेसे नसून त्यासाठी सातत्य, मेहनत आणि जिद्द आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधतानाच देशाच्या विकासातही आपले योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले. प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध विचारधारा असलेले साहित्य वाचून ज्ञानाचा आवाका वाढविण्याचा सल्ला दिला. जीवनात मोठे ध्येय गाठायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती ठेवावी. प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याची मनोमन इच्छा विद्यार्थ्यांनी बाळगावी, असे त्यांनी सांगितले.

वन प्रशिक्षण केंद्राचे संचालक हेमंत शेवाळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धात्मकता, चपळता, नवनिर्मिती, एकमेकांना सहकार्य आणि तडजोड या गुणांसोबतच सहकाराचे तत्त्व आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आव्हानांना सामोरे जाण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी माजी आमदार अरुण पाटील आणि शरद महाजन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी अध्यक्षीय भाषणातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव झाल्याने उपस्थित पालक, विद्यार्थी आणि सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याच कार्यक्रमादरम्यान लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभाही पार पडली. सभेत सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेच्या आर्थिक वाटचालीसह सभासदांच्या हिताशी संबंधित विविध बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.
सभेस प्राचार्य के. जी. पाटील, प्रदीप राणे, व्ही. आर. पाटील, आर. एल. चौधरी, शेतकी संघ संचालक धनंजय फिरके, हर्षद महाजन, चंद्रशेखर चौधरी, कमलाकर भंगाळे, पंडित कोल्हे, संचालक अनिल नारखेडे, अप्पा चौधरी, सुरेश परदेशी, डॉ. गणेश चौधरी, बंडू माहुरकर, लतिका बॉंडे, रेवती पाटील, सुनील नारखेडे, नायब तहसीलदार गुरव, किरण चौधरी आणि अतुल तलेले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक महेंद्र वायकोळे, शेखर चौधरी, किशोर बरहाटे, राजू मिस्त्री आणि राजेंद्र मानेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार व्हाईस चेअरमन मनोजकुमार पाटील यांनी मानले.



