मुक्ताईनगर/बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात गुटख्याची विक्री आणि वाहतुकीवर बंदी असतानाही गुटख्याचा संशयित साठा घेऊन जाणाऱ्या बोलेरो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास बोदवड हद्दीतील शेलवड फाट्यावर घडली. अपघातानंतर घटनास्थळी आढळलेल्या बोलेरो वाहनात विमल गुटख्याच्या पोत्यांमध्ये भरलेला माल असल्याचे सांगण्यात येत असल्याने या घटनेने गुटख्याच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून गुटख्याचा माल घेऊन बोलेरो वाहन बोदवड हद्दीतून जात असल्याची माहिती समोर आली आहे. याच वाहनाची दुचाकीला धडक झाल्यानंतर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पळासखेडा आणि शेलवड परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघातानंतर घटनास्थळी असलेल्या बोलेरो वाहनाची पाहणी केली असता, त्यामध्ये विमल गुटख्याच्या पोत्यांमध्ये भरलेला माल आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक कोणाच्या माध्यमातून केली जात होती, माल नेमका कोठून आणला गेला आणि तो कुठे नेला जात होता, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.

या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरातून अशा प्रकारचे वाहन पुढे गेलेच कसे, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे मुक्ताई पालखी आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांची गस्त आणि बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. अशा परिस्थितीत गुटख्याच्या पोत्यांनी भरलेले वाहन शहरातून पुढे गेले असेल, तर त्याची तपासणी का झाली नाही, वाहनाला मार्गात कुठेही अडविण्यात आले नाही का, असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. मुक्ताईनगर–पूर्णा फाटा मार्गावरून संशयित गुटखा वाहतूक करणारे वाहन शहरातून सुसाट पुढे जाते आणि त्यानंतर बोदवड हद्दीत त्याचा अपघात होतो, ही बाब गंभीर असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे गुटख्याच्या अवैध वाहतुकीमागे नेमकी कोणती साखळी कार्यरत आहे, याचा सखोल तपास करण्याची गरज व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल मोहन पाटील आणि प्रभाकर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित बोलेरो वाहन ताब्यात घेतले असून, त्यातील मालाची अधिकृत पाहणी व तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. वाहनातील मालाचे नेमके स्वरूप, प्रमाण आणि त्याच्या वाहतुकीसंदर्भातील कागदपत्रे याबाबत तपासानंतरच अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराला न्याय मिळावा आणि बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांचा सखोल तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाची वाहतूक आणि त्यामागील संपूर्ण साखळीची चौकशी करण्याची मागणीही जोर धरत आहे.
या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी १९ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण, बोलेरोमधील मालाचे स्वरूप व अधिकृत प्रमाण, मालाचा स्रोत, तो नेमका कुठे नेला जात होता आणि या प्रकरणात कोणावर कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली, याबाबत पोलिस प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गुटखा विक्री व वाहतुकीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात गुटख्याचा संशयित साठा घेऊन वाहन रस्त्यावरून जात असल्याचे प्रकरण समोर आल्याने या संपूर्ण वाहतुकीमागील साखळीचा तपास होणार का, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



