Home Cities अमळनेर खान्देशी परंपरेचा जागर! पाडळसरेत कानबाई उत्सव उत्साहात, त्रिवेणी संगमावर भावपूर्ण विसर्जन

खान्देशी परंपरेचा जागर! पाडळसरेत कानबाई उत्सव उत्साहात, त्रिवेणी संगमावर भावपूर्ण विसर्जन

0
12

अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खान्देशातील अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य मानला जाणारा कानबाईचा तीन दिवसीय पारंपरिक उत्सव अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात साजरा झाला. या तीन दिवसीय उत्सवासाठी नोकरी-व्यवसायानिमित्त परगावी गेलेले नागरिक व भाऊबंदकीतील लोक आपल्या संपूर्ण कुटुंबासह गावात दाखल झाले होते, ज्यामुळे संपूर्ण पाडळसरे गावाला एखाद्या मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

यावर्षी गावातील विजय गुर्जर, रघुनाथ पाटील, भरत गुर्जर आणि बारकू मिस्तरी यांच्या घरी पारंपरिक रीतीरिवाजांनुसार कानबाई मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. स्थापना झाल्यापासूनच तीन दिवस गावात महिला आणि नागरिकांची मोठी लगबग पाहायला मिळाली. नवविवाहित जोडप्यांसह असंख्य भाविकांनी कानबाईच्या दर्शनासाठी रांगा लावून मातेचे आशीर्वाद घेतले. रविवारी रात्री कानबाईची भजने आणि गाण्यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्रभर चाललेल्या या जागरणात भाऊबंदकीतील महिला आणि पुरुषांनी पारंपरिक गाण्यांवर आणि संगीताच्या तालावर फेर धरत, नृत्य करत मातेच्या चरणी नतमस्तक होऊन रात्र जागवून काढली.

त्यानंतर सोमवारी सकाळी आठ वाजेपासूनच कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक आणि पूजनाची लगबग सुरू झाली. महिला व मुलींनी खान्देशी पारंपरिक पोशाख परिधान करून कानबाईच्या जोडप्यांचे विधीवत पूजन केले व नैवेद्य दाखवून सवाद्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात केली. गावातील गल्लीबोळांतून आणि घराघरांतून सुवासिनींनी कानबाई मातेचे भावपूर्ण पूजन केले. चौकाचौकांत डीजे आणि ढोल-ताशांच्या गजरावर ग्रामस्थ व तरुण मंडळी भान हरपून नाचताना दिसत होती.

पुनर्वसित गावातून निघालेली ही मिरवणूक जुन्या पाडळसरे गावात पोहोचल्यानंतर ग्रामदैवत श्री अंबिका मातेच्या मंदिरात सर्व कानबाईंचे एकत्रित सामूहिक पूजन आणि महाआरती करण्यात आली. यानंतर जुन्या गावातून मिरवणूक पुढे सरकत अनेर, बोरी आणि तापी नदीकाठावरील प्रसिद्ध नाटेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचली. तेथे कानबाई मातेला विश्रांती देण्यात आली. नदीतीरावर जमलेल्या सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने सामूहिक आरती केली. “यावर्षीचा खरीप हंगाम भरघोस येऊ दे, गावावरील सर्व संकटे दूर होऊ देत आणि शेतकरी-शेतमजूर सुखी, समाधानी राहू देत,” अशी प्रार्थना मातेच्या चरणी करण्यात आली. अखेर तापी, बोरी व अनेर या नद्यांच्या त्रिवेणी संगमाच्या पवित्र प्रवाहात तापीतीर्थ दाखवून, जड अंतःकरणाने आणि “कानबाई माता की जय” च्या जयघोषात मातेला निरोप देण्यात आला. या भावूक प्रसंगी उपस्थित महिला वर्गाचे डोळे पाणावले होते.


Protected Content

Play sound