यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कोरपावली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासक विलास नारायण अडकमोल यांनी यावल पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आणि घरकुल संगणक ऑपरेटर यांच्या कामकाजाबाबत केलेल्या तक्रारीची प्रशासनाने दखल घेतली आहे. तक्रारीनंतर ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हर्षल चौधरी यांची बदली करण्यात आली असून, घरकुल संगणक डाटा ऑपरेटर जावेद तडवी यांना कामकाजाबाबत सक्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपासून पंचायत समितीसमोर करण्यात येणारे अडकमोल यांचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
कोरपावली ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नारायण अडकमोल यांनी यावल पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागातील कंत्राटी कर्मचारी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हर्षल चौधरी तसेच संगणक डाटा ऑपरेटर जावेद तडवी यांच्या कामकाजावर आक्षेप घेतला होता. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कामकाजामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत त्यांनी यावलच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार निवेदन दिले होते. क्रारीमध्ये संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांवर बदलीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच आठ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास १५ ऑगस्टपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा अडकमोल यांनी दिला होता. त्यामुळे प्रशासनाकडून या तक्रारीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांनी तक्रारीची दखल घेत ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हर्षल चौधरी यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. कोरपावली गावासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून देवेंद्र फेगडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्याचे आदेशही प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. याचबरोबर घरकुल संगणक डाटा ऑपरेटर जावेद तडवी यांना त्यांच्या कामकाजाबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांकडून कामकाजात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे १५ दिवसांच्या आत सर्व घरकुल लाभार्थ्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच निर्धारित कालावधीत कामकाजात सुधारणा न झाल्यास वरिष्ठ पातळीवर संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यासह बदलीचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा इशाराही नोटीसमधून देण्यात आला आहे. त्यामुळे घरकुल योजनेतील प्रलंबित कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाने तक्रारीची दखल घेत अभियंत्याची बदली आणि संगणक ऑपरेटरला नोटीस बजावल्याने प्रशासक विलास अडकमोल यांनी १५ ऑगस्टपासून सुरू करणार असलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे कोरपावलीसह यावल तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नांवर काही प्रमाणात तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावल पंचायत समिती प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे प्रस्तावित आमरण उपोषणाला स्थगिती मिळाली असली, तरी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण होतात का, याकडे आता लक्ष लागले आहे. प्रशासनाने दिलेल्या १५ दिवसांच्या मुदतीत संबंधित कामे पूर्ण करून लाभार्थ्यांना दिलासा मिळणे अपेक्षित आहे.



