नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “मृत्यूनंतरही आपले डोळे कोणाला तरी दृष्टी देऊ शकतात, हृदय एखाद्याच्या शरीरात धडकू शकते. अवयवदान हे केवळ दान नसून एका विझणाऱ्या आयुष्याला दिलेले जीवनदान आहे,” असा भावनिक आणि प्रबोधनात्मक संदेश देत नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने अवयवदानाबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जागतिक अवयवदान दिनानिमित्त आयोजित या रॅलीत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी जागृती केली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रॅलीला विशेष स्वरूप दिले.

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या हातात अवयवदानासंदर्भातील माहितीपत्रके आणि आकर्षक पोस्टर्स होते. “अवयवदान—श्रेष्ठ दान”, “चला, अवयवदानाचा संकल्प करूया, मानवतेचे ऋण फेडूया” अशा घोषणांनी नशिराबाद परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत अवयवदानाबाबत समाजात असलेले गैरसमज, अंधश्रद्धा आणि भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. मृत्यूनंतर शरीराचा कोणताही भाग निरुपयोगी ठरत नाही, उलट अवयवदानाच्या माध्यमातून अनेक गरजू व्यक्तींना नवजीवनाची संधी मिळू शकते, हा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
रॅलीच्या सांगता सभेत डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमन पटेल यांनी अवयवदानाबाबत शास्त्रीय माहिती देत नागरिकांना या सामाजिक चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. एका ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना विविध अवयव प्रत्यारोपणाच्या माध्यमातून जीवनाची नवी संधी मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. देशात आजही अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत असल्याने ग्रामीण भागातूनही अवयवदानाच्या चळवळीला व्यापक प्रतिसाद मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रम घेतले. रॅलीचे शिस्तबद्ध संचलन आरोग्य सेवक दीपक तायडे, सुनील ढाके, संदेश महाजन आणि वासुदेव पाटील यांनी केले. रॅलीतील तांत्रिक व्यवस्था प्रयोगशाळा तंत्रज्ञ नीलिमा येलगिरे आणि विजय सपकाळे यांनी सांभाळली.
रॅलीदरम्यान वाहतूक आणि इतर व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी १०२ रुग्णवाहिका चालक राजाराम पाचपांडे तसेच १०८ रुग्णवाहिका चालक जीवन शिरसाठ आणि बापू मराठे यांनी मोलाचे योगदान दिले. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि नर्सिंग विद्यार्थ्यांच्या समन्वयामुळे संपूर्ण जनजागृती उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी कौतुक केले. आरोग्यविषयक जनजागृतीसोबतच सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणाऱ्या या रॅलीमुळे अवयवदानाविषयी नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली असून, अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



