रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील केऱ्हाळे, मंगरूळ, पिंप्री, मोहगण आणि जुनोने परिसरातील शेतांमधून उभ्या केळीच्या मालाची चोरी होण्याच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांकडून शेतातील केळी परस्पर कापून मध्य प्रदेशातील खरगोन तसेच इतर बाजारपेठांमध्ये विकली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत पोलीस निरीक्षक व तहसीलदारांना निवेदन देऊन केळी चोरीच्या घटनांचा सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दुपारनंतर अनेक शेतकरी तसेच शेतमजूर काम आटोपून लवकर घरी परततात. त्यामुळे काही काळ शेतांमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून चोरटे केळी मालाची चोरी करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चोरी केलेला केळी माल परस्पर कापून पाल मार्गे मध्य प्रदेशातील खरगोन किंवा अन्य बाजारपेठांमध्ये विकला जात असल्याचेही शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या प्रकारातील एका चोरीची घटना १२ ऑगस्ट रोजी घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असून, याबाबत रावेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वर्षभर मेहनत, वेळ आणि मोठी आर्थिक गुंतवणूक करून तयार केलेल्या केळी पिकाची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता निर्माण झाली आहे. केळी काढणीच्या काळात रात्रीच्या वेळी चोरट्यांकडून शेतातील मालावर डल्ला मारला जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने पाहून रात्रीच्या वेळी शेतशिवारात गस्त वाढवावी, संशयास्पद व्यक्ती व वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि चोरीच्या घटनांमागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाचे पीक चोरीला गेल्यास त्यांना दुहेरी आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे चोरीच्या घटनांचा जलदगतीने तपास करून संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी केऱ्हाळे, मंगरूळ, पिंप्री, मोहगण आणि जुनोने परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, निवेदन देण्यासाठी आलेल्या केऱ्हाळे येथील ग्रामस्थांनी गावातून रात्रीच्या वेळी होणारी अवैध वाळू वाहतूक थांबविण्याची मागणीही नायब तहसीलदार संजय तायडे यांच्याकडे केली. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या वर्दळीचा फायदा चोरट्यांनाही मिळत असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपी बैठे पथक तैनात करावे, तसेच रात्रीच्या वेळी प्रभावी गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी पोलिस आणि महसूल प्रशासनाने केळी चोरी तसेच रात्रीच्या अवैध वाहतुकीच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.



