Home Cities यावल पंचायत समिती प्रशासन गप्प? यावलमध्ये दोन कर्मचाऱ्यांविरोधात संताप; १५ ऑगस्टपासून उपोषण!

पंचायत समिती प्रशासन गप्प? यावलमध्ये दोन कर्मचाऱ्यांविरोधात संताप; १५ ऑगस्टपासून उपोषण!

0
29

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समितीच्या घरकुल विभागातील कथित ढिसाळ कारभारामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर आठ ते नऊ महिन्यांपासून घरकुल योजनेचे हप्ते जमा होत नसल्याने ग्रामस्थांना वारंवार पंचायत समितीच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे सांगत कोरपावलीचे माजी सरपंच तथा प्रशासक सरपंच विलास नारायण अडकमोल यांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची तातडीने बदली न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ पासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबत अडकमोल यांनी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार निवेदन दिले आहे. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारे हप्ते तसेच जिओ टॅगिंगसाठी आवश्यक असलेले फोटो व इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याने लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी यावल पंचायत समितीमध्ये वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. रोजचे काम सोडून तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागत असल्याने त्यांच्या वेळेसोबतच आर्थिक खर्चही वाढत असल्याचे अडकमोल यांनी नमूद केले आहे. विशेषतः शेतकरी व कामगार वर्गातील लाभार्थ्यांना या विलंबाचा मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावल पंचायत समितीतील घरकुल विभागात कार्यरत असलेले कंत्राटी संगणक डाटा चालक जावेद तडवी आणि ग्रामीण गृह निर्माण अभियंता हर्षल पाटील यांच्या कामकाजाबाबत अडकमोल यांनी गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. या दोघांच्या कार्यपद्धतीमुळे लाभार्थ्यांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, दोघांची तातडीने बदली करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात यापूर्वीही गटविकास अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तोंडी तसेच लेखी तक्रारी करण्यात आल्याचे अडकमोल यांनी सांगितले. मात्र, तक्रारी करूनही संबंधित प्रश्नांवर अपेक्षित कार्यवाही किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क असून, प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे त्यांना त्रास होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे अडकमोल यांनी निवेदनात म्हटले आहे. लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून रखडलेले हप्ते त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत जावेद तडवी आणि हर्षल पाटील यांची बदली करण्यात आली नाही, तर १५ ऑगस्टपासून पंचायत समिती कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा विलास अडकमोल यांनी दिला आहे. त्यामुळे या तक्रारीवर पंचायत समिती प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

घरकुल योजनेतील हप्ते आणि जिओ टॅगिंग प्रक्रियेतील विलंबाचा प्रश्न तातडीने सोडवून लाभार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवरील आरोपांची प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

 


Protected Content

Play sound