फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या फैजपूरच्या ऐतिहासिक भूमीवर मध्यरात्री ध्वजारोहणाचा अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १९३६ च्या ऐतिहासिक फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या स्मृती जपणाऱ्या स्वातंत्र्य स्मारक, छत्री चौक येथे गुरुवार, दि. १४ ऑगस्ट रोजी रात्री मध्यरात्री स्वातंत्र्यदिनाचे स्वागत करत राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नागरिकांनी रात्री १०.३० वाजता स्वातंत्र्य स्मारक परिसरात एकत्र यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. मध्यरात्री राष्ट्रध्वज फडकवून देशाच्या स्वातंत्र्याचा उत्साह आणि अभिमान व्यक्त केला जाणार असून, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात येणार आहे.

फैजपूरला भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात विशेष स्थान आहे. १९३६ साली याच भूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ऐतिहासिक ग्रामीण अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनामुळे फैजपूरचे नाव देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कायमचे कोरले गेले. राष्ट्रीय चळवळीतील अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीने पावन झालेल्या या ऐतिहासिक भूमीवर मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा जपली जात आहे.
यंदाचा मध्यरात्रीचा ध्वजारोहण सोहळा माजी आमदार शिरीषदादा चौधरी (रावेर) आणि माजी आमदार रमेशदादा चौधरी (यावल) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रभैय्या पाटील, प्रदेश सरचिटणीस ॲड. एव्हरेस्ट राठोड, प्रदेश सरचिटणीस मुफ्ती हारून नदवी, प्रदेश सचिव प्रवीण सरवाडे, जळगाव शहराध्यक्ष जमील शेख तसेच जळगाव ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून जळगाव ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, यावल ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष प्रशांत पाटील, रावेर ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष यशवंत महाजन, फैजपूर शहराध्यक्ष रियाज शेख, यावल शहराध्यक्ष हकीम सेठ आणि रावेर शहराध्यक्ष संग्रक्षक तायडे हे कार्यरत आहेत. त्यांनी फैजपूर तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
स्वातंत्र्याच्या स्मृतींना उजाळा देणे, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन करणे आणि नव्या पिढीला देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास समजावून सांगणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. ऐतिहासिक फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या भूमीवर मध्यरात्री राष्ट्रध्वज फडकविला जाणार असल्याने या सोहळ्याला विशेष ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
फैजपूरच्या ऐतिहासिक भूमीवर मध्यरात्री तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाचे स्वागत करण्याची ही परंपरा देशभक्तीची भावना अधिक दृढ करणारी ठरणार असून, नागरिकांनी या अनोख्या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



