Home Cities चोपडा अडावद येथे संत सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी ; लेझीम, भजनी पथक...

अडावद येथे संत सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी ; लेझीम, भजनी पथक व वृक्षदिंडी ठरले आकर्षण

0
14

अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य पालखी मिरवणुकीत लेझीम पथक, वारकरी भजन, वृक्षदिंडी आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. संत सावता माळी मित्र परिवार, शामराव येसो महाजन विद्यालय आणि आदर्श प्राथमिक शाळेच्या विशेष सहकार्याने पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

११ रोजी सकाळी ८ वाजता मधला माळी वाड्यातील श्री संत सावता महाराज मंदिरापासून मानाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखीत संत सावता महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. पालखी गावातील विविध भागांतून जात असताना घरोघरी महिला भाविकांनी भक्तिभावाने प्रतिमेचे पूजन केले. यावेळी समाजातील शेकडो महिला, युवक व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी मिरवणूक संत सावता महाराज मंदिरापासून सुरू होऊन सुभाष चौक, वरचा माळी वाडा, महात्मा फुले रोड, श्री नवनाथ मंदिर, राजमाता अहिल्याबाई होळकर चौक, श्रीराम मंदिर, ग्रामपंचायत गल्ली, भवानी माता मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिंपी गल्ली, जागेश्वर पतसंस्था, महर्षी वाल्मीक चौक, दुर्गादेवी चौक मार्गे पुन्हा मधला माळी वाडा येथे पोहोचली. मिरवणुकीत शामराव येसो महाजन विद्यालय आणि आदर्श प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले लेझीम पथक विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक वेशभूषेतील लहान शाळकरी विद्यार्थ्यांनीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सादरीकरणामुळे पालखी मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी शाळेच्या स्काऊट पथकाने वृक्षांनी सजवलेली पालखी घेऊन गावातून वृक्षदिंडी काढली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्यात आला. वृक्षदिंडीसाठी सरपंच बुऱ्हाणखा तडवी आणि ग्रामाधिकारी प्रमोद सैंदाने यांनी १०० रोपे उपलब्ध करून दिली. पालखी सोहळ्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचाही जागर करण्यात आला. दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली.

पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शामराव येसो महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांच्यासह एन. ए. महाजन, एस. जी. महाजन, एम. एन. माळी, पी. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पी. एस. पवार, डी. डी. महाजन तसेच आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. महाजन, एस. टी. महाजन, आर. जे. महाजन, वाय. एल. साळुंखे, डी. आर. वाघ, कामिनी चौधरी, पूर्व प्राथमिकच्या शिक्षिका पूनम सुतार, वर्षा महाजन, कविता महाजन, सुनीता महाजन यांनी परिश्रम घेतले. शिक्षकेतर कर्मचारी सी. एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रविंद्र महाजन, कैलास महाजन यांनीही सहकार्य केले.

जागेश्वर भजनी मंडळाच्या वतीने संजय बैरागी, संजय शेलकर, संजय महाजन, प्रवीण महाजन, आबा महाजन यांच्यासह सहकाऱ्यांनी वारकरी भजन सादर केले. भक्तिमय अभंग आणि भजनामुळे वातावरण भारावून गेले आणि भाविक मंत्रमुग्ध झाले. मिरवणुकीचे आणखी एक आकर्षण म्हणजे संत सावता महाराजांची प्रतिमा असलेला भव्य चित्ररथ. ट्रॅक्टरवर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेला हा चित्ररथ पालखीच्या पुढे गावातून मिरविण्यात आला. संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अडावद येथील संपूर्ण समाजाच्या वतीने तिन्ही माळी वाड्यांच्या संयुक्त सहभागातून क्षत्रिय काच माळी समाज मंगल कार्यालयात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरण, भात, बट्टी, गंगाफळाची भाजी आणि साखरेचा हलवा असा प्रसाद केळीच्या पानावर भाविकांना वाटप करण्यात आला. महाप्रसादाच्या आयोजनासाठी युवकांनी विशेष परिश्रम घेतले. पालखी सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय बच्छाव, प्रदीप पाटील यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.


Protected Content

Play sound