चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।जागतिकआदिवासी दिनानिमित्त चोपडा शहरात आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य रॅली काढत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आदिवासी समाजासाठी महत्त्वाची घोषणा करत छत्रपती शिवाजी महाराज सृष्टी, बिरसा मुंडा स्मारक, एकलव्य स्मारक आणि राघोजी भांगरे स्मारक उभारणीसाठी शासनाकडून ५ कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याचे पत्रक आदिवासी बांधवांच्या हातात सुपूर्द केले.
९ ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तरावर आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त चोपडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या आवारातून भव्य रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विविध आदिवासी नृत्य सादर केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर रॅली मार्गक्रमण करत असताना आदिवासी संस्कृतीचा उत्साहपूर्ण आविष्कार पाहायला मिळाला. बाजार समितीपासून सुरू झालेली रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शनि मंदिर, आझाद चौक, पाटील दरवाजा आणि बसस्थानक मार्गे पुन्हा बाजार समिती परिसरात पोहोचली. याठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी जळगाव मनपा नगरसेविका डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, नगराध्यक्ष नम्रताताई पाटील, रवींद्र पाटील, नगरसेवक महेंद्र धनगर, प्रकाश राजपूत, राजेंद्र पाटील, किशोर चौधरी, गटनेते पियुष चौधरी, विकास पाटील, ॲड. शिवराज पाटील, किरण देवराज, नामदेव पाटील, ताहेरखा मण्यार, अमजद खान, रियाजअली सैय्यद, सुभाष सोळंके, डॉ. विकी सनेर, प्रताप पावरा, दत्ता पावरा, नकुल बारेला, ईदा पावरा, मुन्ना पाटील यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.
रॅलीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी स्मारकांच्या मंजुरीबाबत माहिती देताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज सृष्टी, बिरसा मुंडा स्मारक, एकलव्य स्मारक आणि राघोजी भांगरे स्मारकासाठी शासनाकडून एकूण ५ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या स्मारकांच्या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चोपडा शहर आणि परिसरातील आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाला तसेच ऐतिहासिक महापुरुषांच्या स्मृतींना जतन करण्यासाठी महत्त्वाची पायाभरणी होणार आहे.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण आणि पाणी या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येत असल्याचेही आमदार सोनवणे यांनी यावेळी स्पष्ट केले. आदिवासी बांधवांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
चोपड्यातील जागतिक आदिवासी दिनाच्या उत्सवातून आदिवासी समाजाची एकजूट, पारंपरिक संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. त्यातच चार महत्त्वपूर्ण स्मारकांसाठी ५ कोटी रुपयांची मंजुरी जाहीर झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



