यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील डांगपुरा-मण्यारवाडा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने तळघरात बांधून ठेवलेली चार जिवंत गोवंश जनावरे, तीन म्हैसवर्गीय जनावरे तसेच ६५ किलो गोवंशाचे कच्चे मांस असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगपुरा-मण्यारवाडा परिसरातील एका घराच्या तळघरात काही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बांधून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सकाळच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत सुमारे एक लाख रुपये किमतीची चार जिवंत गोवंश जनावरे आणि तीन म्हैसवर्गीय जनावरे आढळून आली. त्याच ठिकाणी सुमारे ६५ किलो गोवंशाचे कच्चे मांसही आढळून आले. या प्रकरणी सैय्यद रशीद निसार कुरेशी, सैय्यद आरिफ सैय्यद निसार, सैय्यद हाफीज सैय्यद निसार कुरेशी आणि सैय्यद अन्सार सैय्यद निसार कुरेशी या चार संशयित आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यावल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ मधील २०१५ च्या सुधारणांनुसार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार पुरुषोत्तम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान सुमारे ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची आणि मांसाची पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत असून, प्रकरणाचा अधिक तपास यावल पोलीस करीत आहेत. डांगपुरा परिसरात झालेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे जनावरे कत्तलीसाठी आणून ठेवण्याच्या प्रकारावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून आले. या प्रकरणातील संशयित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून, तपासादरम्यान आणखी काही बाबी समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.



